नियम पाळा आणि चीनच्या हद्दीपासून दूर रहा

- चीनकडून ब्रिटीश नौदलाला कडक इशारा

बीजिंग/लंडन – ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ व ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’ने साऊथ चायना सीमधून प्रवास करताना संयम दाखवावा, नियम पाळावेत आणि चीनची बेटे तसेच हद्दीपासून दूर रहावे, असा कडक इशारा चीनकडून देण्यात आला आहे. ब्रिटीश युद्धनौकांनी अमेरिकी युद्धनौकांप्रमाणे आक्रमकता दाखविली तर चीन सार्वभौमत्त्वाच्या सुरक्षेसाठी चांगलाच दणका देईल, असेही बजावण्यात आले आहे. चीनच्या या इशार्‍यावर ब्रिटनकडून प्रतिक्रिया उमटली असून, ब्रिटनचा ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’ कायदे पाळून आत्मविश्‍वासाने मोहीम पार पाडेल, अशी ग्वाही ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

नियम पाळा आणि चीनच्या हद्दीपासून दूर रहा - चीनकडून ब्रिटीश नौदलाला कडक इशाराचीनकडून सातत्याने टाकण्यात आलेले दडपण व इशारे झुगारून मंगळवारी ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ तिच्या ‘कॅरिअर स्टाईक ग्रुप’सह साऊथ चायना सीमध्ये दाखल झाली होती. या ‘स्ट्राईक ग्रुप’मध्ये सहा विनाशिका, दोन ‘ऑक्झिलरी शिप्स’, एक पाणबुडी यांचा समावेश आहे. ब्रिटीश नौदलाच्या या मोहिमेवर चिनी प्रसारमाध्यमांकडून आक्रमक टीकास्त्र सोडण्यात आले. चीनचे सरकारी मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाईम्स’ने एका लेखातून ब्रिटीश नौदलाची मोहीम म्हणजे, या क्षेत्रात निव्वळ आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न असल्याची संभावना करण्यात आली आहे.

‘ब्रिटीश नौदलाच्या ताफ्याला आम्ही अत्यंत गंभीर इशारा देत आहोत. साऊथ चायना सीमधून संयमाने प्रवास करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्यांनी नियमांचे नीट पालन करावे. आंतरराष्ट्रीय शिपिंग लेन्सची जाणीव ठेऊन चीनची बेटे व सागरी क्षेत्रांपासून 12 नॉटिकल मैल लांब राहून प्रवास करावा’, असे ‘ग्लोबल टाईम्स’च्या लेखात बजावण्यात आले आहे. चीनचा हा इशारा केवळ ब्रिटनलाच नाही तर अमेरिकेच्या इतर मित्रदेशांनाही असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या मित्रदेशांनी सावधगिरी बाळगून, चीनच्या रेड लाईन्सपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि अधिक आक्रमक भूमिका टाळावी, असा इशाराही देण्यात आला आहे.

‘साऊथ चायना सीमध्ये अमेरिकेच्या मित्रदेशांच्या युद्धनौकांनी, अमेरिकेप्रमाणे बेदरकारपणे वागू नये. त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तर चीनला सार्वभौमत्त्व व क्षेत्रिय अखंडतेच्या सुरक्षेसाठी काय केले जाते, याचे उदाहरण जगासमोर ठेवावे लागेल’, अशा शब्दात धमकावण्यात आले आहे. यावेळी एका चिनी म्हणीचा उल्लेखही करण्यात आला आहे. ‘एकाला मारले तर तो इतर 100 जणांसाठी इशारा असतो’, या म्हणीचा उल्लेख करून ब्रिटीश विमानवाहू युद्धनौका व ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’ला इशारा देण्यात आला आहे. ब्रिटनने साऊथ चायना सीमध्ये तैनाती करणे ही कल्पनाच धोकादायक असल्याची जाणीवही करून देण्यात आली आहे.नियम पाळा आणि चीनच्या हद्दीपासून दूर रहा - चीनकडून ब्रिटीश नौदलाला कडक इशारा

चीनकडून देण्यात आलेल्या या धमकावणीवर ब्रिटनकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करून, नौदलाचा ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’ आंतरराष्ट्रीय नियम व कायद्यानुसार साऊथ चायना सीमधून प्रवास करीत असल्याचे म्हंटले आहे. ‘या क्षेत्रातून करण्यात येणारा प्रवास कोणालाही चिथावणी देण्यासाठी नाही. ब्रिटीश नौदल आत्मविश्‍वासाने मोहीम पार पाडेल’, असेही ब्रिटनच्या संरक्षणमंत्रालयाने स्पष्ट केले. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या जपानच्या दौर्‍यात चीनच्या आक्रमकतेची कल्पना असल्याचे वक्तव्य केले होते.

‘आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या जहाजांवर चीन लक्ष ठेवते व त्यांचा पाठलागही करते, हे काही आता लपून राहिलेले नाही. आम्ही चीनचा आदर करतो आणि चीनही आमचा आदर करेल, अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर राखून ब्रिटीश नौदल आपली मोहीम राबवेल’, असे संरक्षणमंत्री वॉलेस यांनी म्हंटले होते.

leave a reply