गेल्या सहा दशकांमध्ये पहिल्यांदाच चीनच्या लोकसंख्येत घसरणीची नोंद

चिनी जनतेमध्ये सरकारी धोरणांविरोधात नाराजीचा सूर

chinas-population-has-shrunk-in-2022बीजिंग – गेल्या अनेक दशकांपासून राबविण्यात येणारी ‘वन चाईल्ड पॉलिसी’ व 2019 सालापासून सुरू असलेली कोरोनाची साथ या पार्श्वभूमीवर 2022 साली चीनच्या लोकसंख्येत घसरण झाल्याचे समोर आले. गेल्या वर्षी चीनची लोकसंख्या साडेआठ लाखांनी घसरल्याची माहिती ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने दिली आहे. 1961 सालानंतर पहिल्यांदाच चीनच्या लोकसंख्येची घसरण झाली आहे. यामुळे आता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरतो, असा दावा संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या तज्ज्ञांनी केला आहे. तर जगातील आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांनी, लोकसंख्येतील मोठी घट ही बाब मानवी संस्कृतीच्या भविष्यासाठी धोका ठरतो, असा इशारा दिला आहे.

chartमंगळवारी चीनच्या ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने देशातील लोकसंख्येची माहिती जाहीर केली. त्यानुसार, 2022 साली चीनची लोकसंख्या 141 कोटी म्हणजेच 1.411 अब्ज इतकी आहे. 2021 सालच्या तुलनेत यात सुमारे 8 लाख, 50 हजारांची घट झाली आहे. 2022 साली चीनमधील जन्मदर दर हजारामागे 6.77पर्यंत खाली घसरला आहे. जन्मदराची नोंद ठेवण्यास सुरुवात केल्यानंतरची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरते. मुलांना जन्म देणाऱ्या 25 ते 35 वर्षे या वयोगटातील महिलांची संख्या तब्बल 40 लाखांनी घटल्याचे ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने स्पष्ट केले.

जन्मदर व जन्म देणाऱ्या महिलांची संख्या घटत असतानाच चीनमधील मृत्यूदर वाढतो आहे. 2022 साली दर हजार नागरिकांमागे 7.37 जणांचा मृत्यू झाला. 1974 सालानंतरचा हा सर्वाधिक मृत्यूदर ठरला आहे. चीनमधील लोकसंख्येच्या घसरणीमागे 1980 ते 2015 अशी तब्बल 35 वर्षे राबविण्यात आलेली ‘वन चाईल्ड पॉलिसी’ हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते. 2016 नंतर चीनने हे धोरण शिथिल केले असले तरी चिनी जनतेेने हे बदल स्वीकारण्याची तयारी केली नसल्याचे नवी आकडेवारी दाखवून देते, याकडे चीनमधील तज्ज्ञांनी लक्ष वेधले.

China's populationचीनमधून समोर आलेल्या माहितीनंतर चीनसह आंतरराष्ट्रीय पातळीवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. चीनमधील घसरणीनंतर आता भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून करण्यात आला.

भारताची लोकसंख्या 1.412 अब्ज असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघटनेने सांगितले. त्याचवेळी चीनच्या लोकसंख्येतील घसरण सुरू राहिल्यास 2050 सालापर्यंत त्यात 10 कोटींहून अधिक घट होऊ शकते, असा इशाराही दिला. चीनमधील नागरिकांनी सरकारी धोरणांवर नाराजी व्यक्त केली. घसरण रोखायची असेल, तर मुले वाढविण्यासाठी सरकारने कुटुंबांना अधिक सहाय्य व सवलती द्यायला हव्यात, असा सूर चिनी नागरिकांमधून उमटत आहे.

दरम्यान, जगातील आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांनी लोकसंख्येतील घसरणीच्या मुद्यावर गंभीर इशारा दिला. लोकसंख्येतील घसरण ही मानवतेच्या अस्तित्वासाठी मोठी समस्या ठरु शकते, असे मस्क यांनी सोशल मीडियावरून बजावले आहे. चीनपूर्वी अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया तसेच युरोपिय देशांमध्येही लोकसंख्या वेगाने घसरत असल्याची बाब समोर आली आहे.

leave a reply