परराष्ट्रमंत्री जयशंकर ग्रीसच्या भेटीवर

- इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये ग्रीसचा सहभाग

नवी दिल्ली – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ग्रीसच्या भेटीवर आहेत. त्यांनी ग्रीसचे पंतप्रधान केरियाकोस मित्सोताकिस आणि परराष्ट्रमंत्री निकोस देंदियस यांची भेट घेऊन चर्चा केली. दहशतवादाबरोबरच हिंसक कट्टरवादापासून फार मोठा धोका संभवतो, यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. त्याचवेळी भारताने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’मध्ये ग्रीसनेही सहभाग घेतला असून यावर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर ग्रीसच्या भेटीवर - इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये ग्रीसचा सहभागपाकिस्तान व तुर्की या देशांनी भक्कम राजकीय आणि लष्करी आघाडी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फार मोठा परिणाम ग्रीसवर होऊ शकतो. तुर्कीबरोबरील सागरी वादामुळे ग्रीसची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. तुर्की ग्रीसच्या विरोधात लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे धमकावत आहेत. त्याचवेळी आफ्रिकन तसेच इतर देशांमधून आपल्या भूभागात शिरणारे निर्वासितांचे लोंढे ग्रीसमध्ये सोडून देण्याची धमकीही तुर्कीकडून दिली जात आहे. अशा परिस्थितीत ग्रीसने भारताबरोबरील सहकार्य वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. भारतानेही त्याला प्रतिसाद दिला असून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या ग्रीस भेटीत त्याचे प्रतिबिंब उमटले आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या दौर्‍यात ग्रीसने इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये (आयएसए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला व याच्या करारावर स्वाक्षरी केली. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी याचे स्वागत केले. ‘आयएसए’ही भारताने पुढाकार घेऊन स्थापन केलेली संघटना असून पर्यावरणपूरक सौरऊर्जेचा पुरस्कार करणे व यासाठी आघाडी उघडणे हे याचे प्रमुख ध्येय मानले जाते. त्याचवेळी या संघटनेकडे राजकीय प्रभाव टाकण्याची क्षमता असल्याचे दावे काहीजणांकडून केले जात आहेत. विशेषतः भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव यातून अधोरेखित होत असल्याचे स्पष्ट होत आहे, संकेत दिले जातात.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित व्यवस्थेचा यावेळी भारत व ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुरस्कार केला. दुसर्‍या देशाचे सार्वभौमत्त्व तसेच क्षेत्रिय अखंडता याचा सर्वांनीच आदर करावा व आंतरराष्ट्रीय कायद्यांची चौकट मोडू नये, अशी अपेक्षा भारत व ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अरेरावी करणारा चीन तसेच ग्रीसच्या सागरी हद्दीवर दावा सांगणारा तुर्की, या दोन्ही देशांना भारत व ग्रीसने याद्वारे लक्ष्य केल्याचे दिसत आहे. सध्या पूर्व मेडिटेरियन सागरी क्षेत्रात ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्याची दखल घेऊन या विषयावर भारत व ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा पार पडली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती उघड केली.

त्याचवेळी दहशतवाद व हिंसक कट्टरवाद यापासून जगाला फार मोठा धोका संभवतो, यावर भारत आणि ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांचे एकमत झाले आहे. तसेच यामध्ये सीमेपलिकडून निर्यात केल्या जाणार्‍या दहशतवादाचाही समावेश असल्याचे दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मान्य केले. दहशतवादाचे कुठल्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि परराष्ट्रमंत्री देंदियस यांनी ठासून सांगितले.

पाकिस्तान आणि तुर्कीसारखे बेजबाबदार देश लोकशाहीवादी भारत व ग्रीस या देशांच्या विरोधात आघाडी उभी करीत असताना, भारत व ग्रीसने त्याला आपले सहकार्य भक्कम करून प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन ग्रीसचे विश्‍लेषक करीत आहेत. तसेच दोन्ही देशांमध्ये हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध असल्याची आठवण देखील ग्रीसचे विश्‍लेषक करून देत आहेत.

leave a reply