परराष्ट्रमंत्री जयशंकर इस्रायलच्या भेटीवर

तेल अविव- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर इस्रायलच्या पाच दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत. इस्रायलमध्ये पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचे सरकार आल्यानंतर भारताची इस्रायलबरोबरील ही पहिलीच उच्चस्तरिय चर्चा ठरते. आखाती क्षेत्रात फार मोठ्या घडामोडी सुरू असताना, भारत व इस्रायलच्या धोरणात्मक सहकार्याला प्रचंड महत्त्व आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची ही इस्रायल भेट लक्षणीय ठरते.

परराष्ट्रमंत्री जयशंकर इस्रायलच्या भेटीवरशालोम इस्रायल! असे सोशल मीडियावर अभिवादन करून जयशंकर यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून आपल्या पहिल्या इस्रायल भेटीची माहिती दिली. पहिल्या महायुद्धात इस्रायलसाठी बलिदान देणार्‍या ९०० भारतीय सैनिकांच्या स्मारकाला भेट देऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या दौर्‍याची सुरूवात केली. त्यांच्या पाच दिवसांच्या या दौर्‍यात दोन्ही देशांच्या धोरणात्मक तसेच व्यापारी सहकार्यावर महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. विशेषतः आखाती क्षेत्रात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, भारत व इस्रायलचे सहकार्य ही लक्षणीय बाब ठरते, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

गेल्या वर्षी इस्रायलने संयुक्त अरब अमिरात व इतर काही आखाती देशांबरोबर ‘अब्राहम करार’ केला होता. या करारामुळे आखाती देशांनी इस्रायलला मान्यता देऊन राजनैतिक तसेच आर्थिक सहकार्य प्रस्थापित करण्याचे मान्य केले होते. आधीच्या काळात इस्रायलचे अस्तित्त्वच अमान्य करणार्‍या देशांच्या भूमिकेत झालेला हा बदल म्हणजे धोरणात्मक पातळीवरचा भूकंपच असल्याचे दावे केले जातात. यामुळे आखाती क्षेत्रात फार मोठे बदल झाले असून अशा परिस्थितीत आखाती क्षेत्रात भारत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असा दावा इस्रायलचे अधिकारी करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आखाती देशांबरोबरील भारताचे वाढते सहकार्य याची साक्ष देत आहे. म्हणूनच जयशंकर यांच्या या इस्रायल दौर्‍याकडे विश्‍लेषक अत्यंत बारकाईने पाहत आहेत.

सध्या इस्रायलमध्ये नवे सरकार सत्तेवर असून पंतप्रधान बेनेट यांचे सरकार देखील भारताशी उत्तम सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी आधीच्या इस्रायली सरकार इतकेच उत्सुक असल्याचे दाखले दिले जातात. अमेरिकेत बायडेन राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, त्यांच्या इराणधार्जिण्या धोरणांविरोधात इस्रायलच्या सरकारने ठाम भूमिका स्वीकारली आहे. अशा परिस्थितीत आखातातील सौदी, संयुक्त अरब अमिरात या देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करून इस्रायल अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला प्रत्युत्तर देण्याची तयारी करीत आहे. भारताचे इराणशीही उत्तम संबंध असले, तरी इस्रायल व आखाती देशांची आघाडी या क्षेत्राचे स्थैर्य तसेच मोठा आर्थिक भागीदार देश म्हणून भारताकडे विश्‍वासाने पाहत असल्याचे याआधी स्पष्ट झाले होते.

leave a reply