परराष्ट्रमंत्री जयशंकर युएईच्या भेटीवर

दुबई – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दौर्‍यावर असून त्यांची युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांच्याशी चर्चा पार पडली. दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका एक्स्पोमध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची स्लोव्हाकिया, सायप्रस आणि लक्झेंम्बर्ग या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी भेट झाली. या युएई भेटीदरम्यान, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारत, युएई, अमेरिका आणि इस्रायल यांच्या ‘वेस्ट एशियन क्वाड’ची लवकरच बैठक संपन्न होईल, असे लक्षवेधी विधान केले होते.

युएईच्या दुबईमध्ये भव्य एअर शोचे आयोजन करण्यात आले असून भारत देखील यात सहभागी झाला आहे. भारतीय बनावटीची तेजस विमाने या एअर शोमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत. सदर एअर शोला भेट देण्यासाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर युएईत दाखल झाले. युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांनी त्यांचे स्वागत केले व दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत व युएईमधील व्यापक धोरणात्मक सहकार्यासाठी क्राऊन प्रिन्स झाएद फार मोठे योगदान देत असल्याचे सांगून जयशंकर यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छापर संदेश क्राऊन प्रिन्स झाएद यांना दिला. युएईच्या विकासासाठी सदिच्छा देऊन पंतप्रधान मोदी यांनी उभय देशांच्या द्विपक्षीय सहकार्यात फार मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भारताबरोबरील मैत्रीपूर्ण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी युएई उत्सूक असल्याचे सांगून क्राऊन प्रिन्स झाएद यांनीही भारताच्या पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, पश्‍चिम आशियाई क्वाड म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारत, इस्रायल, अमेरिका व युएई यांच्या सहकार्याकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या सहकार्यामुळे पश्‍चिम आशियातील भारताचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढणार असून त्याचे फार मोठे लाभ भारताला मिळतील, असे दिसते. पाकिस्तान व चीन यामुळे अस्वस्थ झाले असून या इंधनसंपन्न तसेच आर्थिक व सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रातील भारताचा प्रभाव वाढणे, याचाच अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेची प्रचंड वेगाने प्रगती होणे, असा होतो, हे पाकिस्तानचे विश्‍लेषक आपल्या सरकारच्या लक्षात आणून देत आहेत.

त्यातच जम्मू व काश्मीरमध्ये गुंतवणूकीची घोषणा करून युएईने पाकिस्तानला जबर धक्का दिला आहे. तसेच श्रीनगर-शारजा हवाईसेवा सुरू करून युएईने पाकिस्तानला बेचैन करून सोडले आहे. या हवाई सेवेसाठी आपली हद्द वापरू देण्यास पाकिस्तानने नकार दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तरीही पाकिस्तान भारत व युएईमधील सहकार्य रोखू शकणार नाही. पुढच्या काळात हे सहकार्य अधिकाधिक विकसित होत जाईल, असे पाकिस्तानच्या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची ही युएई भेट लक्षवेधी ठरते.

leave a reply