अमेरिकेवरील सायबरहल्ल्यामागे रशियाचाच हात असल्याची परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांची कबुली

- ‘अ‍ॅक्ट ऑफ वॉर’ असल्याची अमेरिकी सिनेटरची टीका

वॉशिंग्टन/मॉस्को – ‘थर्ड पार्टी सॉफ्टवेअरचा वापर करून अमेरिकेतील सरकारी विभागांच्या नेटवर्कमध्ये घुसण्याचा मोठा प्रयत्न झाला आहे. खाजगी कंपन्या व जगातील इतर देश तसेच कंपन्यांच्या नेटवर्कमध्येही घुसखोरी झाल्याचे समोर येत आहे. हा एक अतिशय मोठा हल्ला आहे आणि सध्या जी माहिती हाती आली आहे त्यानुसार या हल्ल्यामागे रशियाचा हात आहे, असे ठामपणे सांगता येईल’, या शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिकेवर झालेल्या सायबरहल्ल्यामागे रशियाचा हात असल्याची स्पष्ट कबुली दिली.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या अर्थ व व्यापार विभागाच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सवर सायबरहल्ला झाल्याची माहिती ‘सायबरसिक्युरिटी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी’ने (सीआयएसए) जाहीर केली होती. हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा संशय वरिष्ठ अधिकारी, विश्‍लेषक तसेच तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये सायबरहल्ल्याची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचे समोर आले असून हा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेतील सात प्रमुख सरकारी विभागांसह ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘फायर आय’ व ‘सोलरविंड्स’सारख्या अनेक खाजगी कंपन्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उघडपणे हल्ल्यामागे रशिया असल्याची कबुली देणे खळबळ उडविणारे ठरते. अमेरिकेवर गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणावर सायबरहल्ले होत असून त्यामागे रशिया, चीन, इराण, उत्तर कोरिया यासारख्या देशांचा हात असल्याचे आढळले आहे. अमेरिकेतील अनेक सरकारी अहवालांमध्येही त्याचा उल्लेख आहे. मात्र अमेरिकन सरकारचा भाग असलेल्या वरिष्ठ मंत्र्यांनी हल्ल्यानंतर काही दिवसातच रशियासारख्या देशाकडे उघडपणे बोट दाखविण्याची ही पहिलीच घटना ठरते. रशियावर सायबरहल्ल्याचा ठपका ठेवतानाच, अमेरिकी जीवनशैली व स्वातंत्र्याला सर्वाधिक धोका असणार्‍यांच्या यादीत रशिया व त्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे स्थान वरचे आहे, असेही पॉम्पिओ यांनी बजावले.

अमेरिकन सरकार व खाजगी कंपन्यांवर झालेल्या सायबरहल्ल्यावर संसद सदस्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. डेमोक्रॅट पक्षाचे सिनेटर चार्ल्स कून्स यांनी रशियन सायबरहल्ला म्हणजे निव्वळ आक्रमण नसून ‘अ‍ॅक्ट ऑफ वॉर’ असल्याचे टीकास्त्र सोडले. संसद सदस्य जेसन क्रो यांनी, रशियाचा हल्ला अमेरिकेवरील सर्वात मोठा सायबरहल्ला असून त्याची तुलना पर्ल हार्बरवर झालेल्या हल्ल्याशीच होऊ शकते, असा दावा केला आहे. अमेरिकेतील प्रमुख सायबरकंपन्यांनीही रशियन सायबरहल्ल्याची व्याप्ती अभूतपूर्व असल्याचे म्हटले असून अजूनही पूर्ण माहिती हाती आली नसल्याकडे लक्ष वेधले आहे.

अमेरिकी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून सायबरहल्ले सुरू करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात ‘फायर आय’ या सायबरसुरक्षा कंपनीवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेतील सरकारी विभागांवर झालेल्या सायबरहल्ल्यांची माहिती उघडकीस आली.

leave a reply