चीनला वठणीवर आणण्यासाठी भारताने ‘क्वाड’बरोबरील सहकार्य वाढवावे

- माजी नौदलप्रमुख व सामरिक विश्‍लेषकांची मागणी

चंदिगड – भारताच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या हालचाली करणार्‍या चीनला वठणीवर आणण्यासाठी भारताने ‘क्वाड’मधील सहभाग वाढवावा, असे माजी नौदलप्रमुख तसेच सामरिक विश्‍लेषक व मुत्सद्दी सुचवित आहेत. आत्तापर्यंत भारताने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारून चीनला दुखावण्याचे टाळले होते. पण चीन भारताच्या विरोधात आक्रमक लष्करी हालचाली करीत असताना, चीनच्या विरोधात इतर देशांचे सहकार्य घेण्यावाचून भारतासमोर दुसरा पर्याय नाही, असे या सर्वांचे म्हणणे आहे. चंदिगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मिलिटरी लिट्रिचर फेस्टीव्हल’मध्ये सहभागी झालेल्या माजी नौदलप्रमुख, सामरिक विश्‍लेषक आणि मुत्सद्यांचे म्हणणे आहे.

२००७ साली जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे शिंजो यांनी सर्वात आधी भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या लोकशाहीवादी देशांचा समावेश असलेल्या ‘क्वाड’ची संकल्पना मांडली. सुरूवातीच्या काळात या आघाडीत सहभागी होऊन चीनला दुखावण्याचे ऑस्ट्रेलियाने टाळले होते. पण २०१७ साली चीनची वर्चस्ववादी भूमिका तीव्र झाली आणि त्यानंतर क्वाडचे महत्त्व वाढत गेले, असे माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लान्बा यांनी लक्षात आणून दिले. तर विख्यात सामरिक विश्‍लेषक व नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या ‘इन्स्टीट्युट ऑफ साऊथ एशियन स्टडीज्’ विभागाचे संचालक सी. राजा मोहन यांनी भारताने इतिहासातून बोध घेण्याची आवश्यकता असल्याचा परखड सल्ला दिला.

‘आत्ताच्या काळात भारताला असलेला धोका वाढत चालले आहे. त्यामुळेच आधीच्या काळापेक्षाही आत्ता इतर देशांबरोबर सुरक्षाविषयक सहकार्य वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यामुळे एकाच नाही, तर अनेक आघाड्यांवर भारताला जलदगतीने हालचाली करून क्वाड तसेच क्षेत्रिय देशांच्या संघटनांबरोबरील सहकार्य वाढवावे लागेल. आत्ताच्या काळात भारताला तटस्थ परराष्ट्र धोरण परवडणारे नाही. ज्या पद्धतीने चीन भारताला धमकावत आहे, ते लक्षात घेता केवळ लष्करीच नाही, तर आर्थिक क्षमता भारताला वाढवावीच लागेल’, असा निष्कर्ष सी. राजा मोहन यांनी नोंदविला आहे.

भारत चीनच्या विरोधात इतर देशांबरोबर वाढवित असलेल्या सहकार्याचे केंद्र ‘क्वाड’ असले पाहिजे, असे राजा मोहन पुढे म्हणाले. तर भारतीय नौदलाचे माजी व्हाईस अ‍ॅडमिरल प्रदीप चौहान यांनी चीन भारताकडे आपल्या ‘टार्गेट’ म्हणून पाहत असल्याचा आरोप केला. म्हणूनच भारताने चीनच्या विरोधात धोरण तयार ठेवणे आवश्यक असल्याचा दावा व्हाईस अ‍ॅडमिरल चौहान यांनी केला आहे.

दरम्यान, भारतीय सामरिक विश्‍लेषक तसेच संरक्षणदलांचे माजी अधिकारी वारंवार चीनबाबत भारताला इशारे देत आले आहेत. गलावनमधील संघर्षानंतर भारताने चीनच्या विरोधात आक्रमक कारवाया सुरू केल्या होत्या. त्याच्या आधी चीनच्या विरोधात भूमिका घेण्याचे भारताने टाळले होते. पण लडाखचा सीमावाद छेडून चीनने आपले फार मोठे नुकसान करून घेतले आहेत, यामुळे भारतीय जनतेमध्ये चीनच्या विरोधात पराकोटीचा संताप असल्याचे संकेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकतेच दिले होते. यामुळे भारतीयांचा विश्‍वास कमावण्यासाठी कित्येक दशकांचे चीनने केलेले प्रयत्न वाया गेले आहेत, असे सांगून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला वास्तवाची जाणीव करून दिली होती.

leave a reply