माजी हेर असलेल्या जर्मन विश्‍लेषकाची चीनसाठी हेरगिरी

बर्लिन – जर्मनीच्या गुप्तचर विभागाचे हेर म्हणून काम करून निवृत्त झालेल्या प्रख्यात विश्‍लेषक क्लॉस लँज यांनी चीनसाठी हेरगिरी केल्याचे उघड?झाले आहे. जर्मन यंत्रणांनी लँज यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. जर्मनीची अतिसंवेदनशील माहिती चीनला पुरवून क्लॉस लँज देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा ठपका जर्मन यंत्रणांनी ठेवला आहे. याआधी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व भारतात देखील चीनसाठी हेरगिरी करणार्‍यांना अटक झाली होती. यामुळे चीन इतर देशांमध्ये करीत असलेल्या कारवाया व हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

जर्मन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, क्लॉस लँज यांनी जर्मनीच्या ‘फेडरल इंटेलिजन्स सर्व्हिस-बीएनडी’मध्ये सुमारे 50 वर्षे हेर म्हणून काम केले होते. जर्मन एजन्सीमधून निवृत्त झाल्यानंतर लँज यांनी 2010 साली अभ्यासगटात राजकीय विश्‍लेषक म्हणून काम सुरू केले होते. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या ‘ख्रिश्‍चन सोशल युनियन’ या पक्षाशी हा अभ्यासगट संलग्न असल्याचा दावा केला जातो. जर्मन अभ्यासगटासाठी विश्‍लेषक म्हणून काम करीत असतानाच लँज यांनी ‘डबल एजंट’ म्हणून चिनी गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी सुरू केल्याचा आरोप जर्मन यंत्रणांनी केला आहे. 2010 साली चीनच्या शंघाय येथील ‘ताँग्जी विद्यापीठात’ व्याख्यानासाठी गेेले असताना, चिनी गुप्तचर संघटनेने लँज यांना डबल एजंट म्हणून वापरण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2019 सालापर्यंत लँज यांनी विश्‍लेषकाच्या चेहर्‍याआड डबल एजंट म्हणून चिनी गुप्तचर यंत्रणेसाठी काम केले होते.

साधारण दहा वर्षांच्या या कालावधीत लँज यांनी जर्मनीच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती चिनी गुप्तचर यंत्रणेला पुरविली. ही माहिती मिळविण्यासाठी जर्मन राजकारणातील आपल्या काँटॅक्ट्सचा वापर केल्याची लँज यांनी कबुली दिली. त्याचबरोबर लँज यांनी चिनी गुप्तचर यंत्रणेतील संबंधित अधिकार्‍यांची माहिती जर्मन गुप्तचर यंत्रणेला पुरविली. लँज यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे जर्मनीचे किती नुकसान झाले, चीनने त्याचा कुठे वापर केला, हे स्पष्ट झालेले नाही. पण लँज यांच्या कबुलीमुळे जर्मन व्यवस्थेतील चिनी गुप्तचर यंत्रणेचा शिरकाव उघड झाला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये चीनची गुप्तचर यंत्रणा, लष्कराने इतर देशांच्या राजकीय, लष्करी तसेच शैक्षणिक व्यवस्थेत केलेल्या घुसखोरीच्या बातम्या समोर आल्या आहेत. जर्मनीप्रमाणे अमेरिकी गुप्तचर यंत्रणा आणि लष्करात चीनचे डबल एजंट असल्याचे उघड झाले होते. तर चीनच्या गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणार्‍या ब्रिटनच्या माध्यमांमधील तीन पत्रकारांना ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय5’ने हलकेच बाजूला केले होते. भारतातही चीनसाठी हेरगिरी करणार्‍या पत्रकाराला ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे.

याशिवाय अमेरिका, ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चीनच्या लष्कराचे हेर असल्याचा आरोप झाला होता. यामध्ये चिनी नेते व लष्करी अधिकार्‍यांच्या मुलांचा समावेश असल्याच्या बातम्या आल्या होत्या. चीन इतर देशांमध्ये करीत असलेल्या कारवाया आणि हस्तक्षेपाच्या घटना एकामागोमाग एक उघड झाल्यामुळे जगभरातून चीनकडे संशयाने पाहिले जात आहे.

leave a reply