जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांची हत्या

-भारताचा मित्र हरपल्याची पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया

टोकिओ – जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांची हत्या झाली आहे. तेत्सुया यामागामी नावाच्या इसमाने गोळ्या झाडून ॲबे यांचा बळी घेतल्याचे सांगितले जाते. सर्वाधिक काळ जपानचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या ॲबे यांच्या हत्येचे जगभरात पडसाद उमटत असून जगभरातील प्रमुख नेत्यांनी यावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ॲबे भारताचे विश्वासार्ह मित्र होते, असे सांगून त्यांची हत्या आपल्यासाठी धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. ॲबे यांच्यासाठी भारताने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

Abe

2020 सालीच ॲबे यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. असे असले तरी ते राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. शुक्रवारी जपानमधील निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शिंजो ॲबे जनतेला संबोधित करीत होते. यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. छाती आणि मानेचा वेध घेणाऱ्या या गोळ्यांनी झालेल्या जबर जखमांमुळे प्रंचड प्रमाणात रक्तस्त्राव झाला व यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलने दिली. ॲबे यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान फुमिओ किशिदा व जपानच्या अन्य नेत्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

जगभरातील प्रमुख देशांनी ॲबे यांच्या हत्येचा निषेध करून त्यावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. चीनने ॲबे यांची हत्या धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली. पण चीनच्या सोशल मीडियावर मात्र सेलिब्रेशन सुरू आहे. ॲबे यांचा मारेकरी ‘हिरो’ असल्याचा दावा चीनच्या सोशल मीडियावर केला जात आहे. याचवेळी भारतात मात्र शिंजो ॲबे यांच्या निधनावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भारताचा विश्वासार्ह मित्र असलेला नेता हरपला, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी यावर दुःख व्यक्त केले. मे महिन्यातच आपल्या जपान दौऱ्यात आपण शिंजो ॲबे यांची भेट घेतली होती, याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी करून दिली.

Shinzo-Abe
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांची हत्या

67 वर्षांचे ॲबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहणारे नेते ठरले. ॲबे यांचे आजोबा जपानचे पंतप्रधान होते, तर त्यांच्या वडिलांनी जपानचे परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिले होते. असा राजकीय वारसा लाभलेले शिंजो ॲबे 2006 साली पहिल्यांदा पंतप्रधानपदावर आले. चीन व उत्तर कोरियाच्या विरोधात त्यांनी स्वीकारलेली कठोर धोरणे आणि त्यांचे आर्थिक धोरण हा जगभरात चर्चेचा विषय बनला होता. याच काळात त्यांनी सर्वात आधी ‘इंडो-पॅसिफिक’ची संकल्पना मांडून हिंदी महासागर ते पॅसिफिक महासागरापर्यंतच्या क्षेत्राचा एकत्रित विचार करण्याचा प्रस्ताव दिला होता.

2012 साली पुन्हा एकदा जपानच्या पंतप्रधानपदावर आल्यानंतर त्यांनी ‘इंडो-पॅसिफिक’च्या संकल्पनेला अधिक बळ देऊन या क्षेत्रात भारताची फार मोठी भूमिका असल्याचे लक्षात आणून दिले होते. भारत आणि जपानच्या सहकार्याबाबत ॲबे यांची निश्चित अशी भूमिका होती. वेळोवेळी त्यांनी याचा पुरस्कार केला होता. त्यांच्याच कार्यकाळात भारत व जपानचे सहकार्य नव्या उंचीवर पोहोचले होते.

पंतप्रधानपदावर असताना ॲबे यांची भारतभेट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला होता. भारतीय संस्कृतीबाबत ॲबे यांना वाटत असलेला आदर नेहमीच व्यक्त होत राहिला. त्याचवेळी भारतानेही शिंजो ॲबे यांचा आदर व सन्मान केला. 2021 साली ॲबे यांना भारताने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

leave a reply