इंडोनेशियामध्ये भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा

नवी दिल्ली – इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्याशी चर्चा पार पडली. तासभर चाललेल्या या चर्चेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लडाखच्या एलएसीसंदर्भातील भारताची भूमिका परखडपणे मांडली. त्यावेळी भारत व चीनच्या संबंधांमध्ये परस्परांचा आदर, एकमेकांबाबतची संवेदनशीलता व हितसंबंधांची जाणीव ठेवणे अत्यावश्क असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्षात आणून दिले.

India-China-talksगेल्या काही दिवसांपासून इंडोनेशियातील या परिषदेत भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. चीनकडून भारताबरोबरील राजनैतिक पातळीवरील चर्चेसाठी विशेष उत्सूकता दाखविली जात असल्याचे समोर येत आहे. तर भारताने लडखच्या एलएसीवरील चीनच्या लष्कराची तैनाती, ही द्विपक्षीय सहकार्याच्या आड येणारी सर्वात मोठी समस्या असल्याचे बजावले आहे. द्विपक्षीय सहकार्य प्रस्थापित करीत असताना दोन्ही देशांचे हजारो सैनिक सीमेवर एकमेकांच्या समोर खडे ठाकत नाहीत, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनला करून दिली होती.

इंडोनेशियातील चर्चेतही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हा मुद्दा वेगळ्या भाषेत चीनसमोर मांडला. एकमेकांचा आदर न करता व संवेदनशीलता न दाखवता तसेच भारताच्या हितसंबंधांबाबत बेपर्वाई दाखवून चीनला संबंध सुधारता येणार नाहीत, असे जयशंकर यांनी पुन्हा एकदा चीनला बजावलेआहे. त्याचवेळी भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारून चीनने भारताचा रोष ओढावून घेतला आहे. चीनच्या या निर्णयाचा फटका हजारो भारतीय विद्यार्थ्यांना बसलेला आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चेत जयशंकर यांनी हा मुद्दा देखील उपस्थित केला.

यामुळे तासभर चाललेली ही चर्चा भारतीय माध्यमांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्याचवेळी भारत आपल्या मागण्या मागे घेऊन तडजोड करणार नाही, हा संदेश भारताने या चर्चेद्वारे दिला आहे. चीन भारताकडे केवळ बाजारपेठ म्हणून पाहत असून याच्या पलिकडे जाऊन चीन भारताच्या हितसंबंधांचा विचार करायला तयार नाही. पण यापुढे भारत चीनची ही बेपर्वाई खपवून घेणार नाही, हे चीनने समजून घ्यायला हवे, ही बाब वेगवेगळ्या मार्गाने भारत चीनच्या लक्षात आणून देत आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इंडोनेशियातील परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा वास्तवाची जाणीव करून दिल्याचे दिसत आहे.

leave a reply