म्यानमारी लष्कराच्या क्रूर कारवाईनंतर ४० मृतदेह आढळले

- संयुक्त राष्ट्रसंघटनेत म्यानमारच्या दूतांचा दावा

नेप्यितौ/संयुक्त राष्ट्रे – म्यानमारच्या लष्कराने सागैंग भागात केलेल्या कारवाईनंतर या भागात जवळपास ४० जणांचे मृतदेह आढळल्याची माहिती, संयुक्त राष्ट्रसंघटनेतील म्यानमारच्या दूतांनी दिली. ही घटना म्यानमारच्या लष्कराकडून मानवतेविरोधात सुरू असणार्‍या गुन्ह्यांकडे लक्ष वेधणारी असल्याचा दावा म्यानमारचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील दूत क्याव मोए तून यांनी केला. म्यानमारच्या जुंटा राजवटीविरोधात संघर्ष करणार्‍या बंडखोर गटांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

म्यानमारी लष्कराच्या क्रूर कारवाईनंतर ४० मृतदेह आढळले - संयुक्त राष्ट्रसंघटनेत म्यानमारच्या दूतांचा दावाम्यानमारचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील दूत क्याव मोए तून यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात लष्कराकडून क्रूरपणे सुरू असलेल्या कारवायांची माहिती देण्यात आली आहे. ‘म्यानमारच्या लष्कराकडून क्रूर दडपशाही, हत्या व निष्पाप नागरिकांचे अटकसत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवतावादी भूमिकेतून तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. हे घडले नाही तर परिस्थिती खूपच बिघडलेली असेल’, असे तून यांनी पत्रात म्हंटले आहे.

याच पत्रात त्यांनी लष्कराकडून सागैंग भागातील कानी शहराजवळ करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. जुलै महिन्यात लष्कराने बंडखोर गटांविरोधात मोठ्या प्रमाणात हवाईहल्ले व इतर कारवाई केली होती. या कारवाईनंतर कानीजवळच्या जंगलात जवळपास ४० मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांवर प्रचंड छळवणूक केल्याच्या खुणाही आढळल्याचे म्यानमारच्या दूतांनी म्हंटले आहे. लष्कराबरोबरच लष्कराचे समर्थन असणारे गट या भागात मोठ्या प्रमाणात हत्या घडवित असून सामान्य जनतेची लुटालूट करण्यात येत असल्याचा आरोप तून यांनी केला.म्यानमारी लष्कराच्या क्रूर कारवाईनंतर ४० मृतदेह आढळले - संयुक्त राष्ट्रसंघटनेत म्यानमारच्या दूतांचा दावा

फेब्रुवारी महिन्यात म्यानमारच्या लष्कराने बंड करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. लष्कराच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्यानमारच्या जनतेने रस्त्यावर उतरून लोकशाहीवादी आंदोलनाला सुरुवात केली होती. लष्कराकडून सुरू असलेल्या क्रूर कारवाया व भीषण अत्याचारांनंतरही म्यानमारच्या जनतेने माघार घेतलेली नाही. जवळपास सहा महिने उलटून गेल्यानंतरही आंदोलनाची धग कायम असल्याचे दिसून आले असून अनेक भागांमध्ये जुंटा राजवटीविरोधात निदर्शने सुरू आहेत.

दरम्यान, आग्नेय आशियाई देशांच्या ‘आसियन’ गटाने म्यानमारच्या मुद्यावर स्वतंत्र दूताची नेमणूक केल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी याचे स्वागत केले असून आसियन गटाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे.

leave a reply