अणुकराराच्या उल्लंघनावरून फ्रान्स, जर्मनी व ब्रिटनचा इराणला इशारा

फ्रान्स, जर्मनीपॅरिस – इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा करून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने त्यावर चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणबरोबर अणुकरार करण्याची तयारी करीत असताना, प्रसिद्ध झालेल्या या बातमीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटू लागले आहेत. युरोपातील ‘ई-३’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फ्रान्स, जर्मनी व ब्रिटनने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून यावरून इराणला सज्जड इशारा दिला आहे. याआधी रशियाने देखील इराणने अणुकराराचे पालन करावे, असे आवाहन केले होते.

२०१५ साली इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत ‘जॉईंट कॉप्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन’ (जेसीपीओए) करार संपन्न झाला होता, अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी या देशांबरोबर ‘जेसीपीओए’ करार करून इराणने अण्वस्त्रनिर्मिती न करणार नाही, असे मान्य केले होते. आपला अणुकार्यक्रम नागरी वापरासाठीच असेल, याची ग्वाही या कराराद्वारे इराणने दिली होती. पण हा करार केल्यानंतरही इराण छुप्यारितीने अण्वस्त्रे संपादन करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप इस्रायल तसेच सौदी अरेबिया व इतर आखाती देशांकडून सातत्याने करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने (आयएईए) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार इराणवर करण्यात येणार्‍या या आरोपांना दुजोरा मिळाला होता.

फ्रान्स, जर्मनीइराणने आपल्या अणुकार्यक्रमाद्वारे ‘युरेनियम मेटल’ची निर्मिती केल्याचे ‘आयएईए’ने जाहीर केले. ‘युरेनियम मेटल’च्या निर्मितीचा अर्थ अण्वस्त्र संपादन करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असाच होतो, याकडे आयएईएने लक्ष वेधले. यानंतर इराणचे समर्थन करणार्‍या रशियासारख्या देशाकडूनही त्वरित प्रतिक्रिया उमटली होती. इराणने अणुकराराचे पालन करावे आणि ही प्रक्रिया त्वरित थांबवावी, अशी मागणी रशियाने केली होती. त्यानंतर आता फ्रान्स, जर्मनी व ब्रिटनने इराणला इशारा दिला आहे. तिन्ही देशांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात इराणच्या अणुकार्यक्रमावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

‘जेसीपीओए’नुसार इराण पुढची १५ वर्षे ‘युरेनियम मेटल’ अथवा ‘युरेनियम मेट्लर्जी’चा विकास किंवा त्यावर संशोधन करू शकत नाही. तसे करणे ‘जेसीपीओए’चे उल्लंघन ठरते आणि याबाबतचा विश्‍वासार्ह खुलासाही इराणला करता येणे शक्य नाही. त्यामुळे इराणने ही प्रक्रिया रोखावी, अशी मागणी फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनने केली आहे. अशा स्वरुपाच्या कारवाया करून इराण अणुकार्यक्रमावरील राजनैतिक चर्चेत बाधा आणत आहे, असा इशाराही फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनने आपल्या संयुक्त निवेदनात दिला आहे.

फ्रान्स, जर्मनीअमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्यासाठी इराणने अणुकराराचे पालन करावे, असे आवाहन बायडेन यांचे प्रशासन करीत आहे. तर इराण मात्र आपल्या शर्तींवर पुन्हा ‘जेसीपीओए’ लागू करण्यावर ठाम आहे. यासाठी बायडेन यांच्या प्रशासनाला इराणने दोन आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र या अणुकराराचा भाग असलेले फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि रशिया हे देश इराण सदर कराराचे उल्लंघन करीत असल्याचे उघडपणे मान्य करू लागले आहेत. त्यामुळे इराणबरोबरील अणुकरार नव्याने लागू करण्याचा मार्ग अधिकच अवघड बनला आहे. त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रसज्ज बनू देणार नाही, असा इशारा देणार्‍या इस्रायलची इराणवरील कारवाई रोखणेही आता पाश्‍चिमात्य देशांसाठी अधिक अवघड बनत चालले आहे. त्यातच सौदी, युएई व आखातातील इतर मित्रदेशांनी इराणच्या धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायलच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय?घेतल्याने, आखाती क्षेत्रातील तणाव वाढत चालला आहे.

leave a reply