उघुरवंशियांवरील अत्याचाराची बातमी दिल्याने चीनची ‘बीबीसी’वर बंदी

‘बीबीसी’बीजिंग/लंडन – गेल्या आठवड्यात चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीचा परवाना रद्द करणार्‍या ब्रिटनला चीनने प्रत्युत्तर दिले आहे. ब्रिटनची सरकारी वृत्तसंस्था ‘बीबीसी’ उघुरवंशियांबाबत पक्षपाती माहिती देत असल्याचा आरोप करून त्यावर बंदी जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी या चीनच्या राजवटीवर टीकास्त्र सोडले असून ‘बीबीसी’नेही सदर निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ने २ फेब्रुवारी रोजी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने उभारलेल्या छळछावण्यांमध्ये उघुरवंशियांवर होणार्‍या अत्याचाराचा अहवाल प्रसिद्ध केला होता. हा अहवाल पक्षपाती असल्याचा आरोप चीनने केला आहे. ‘बीबीसीने निष्पक्ष वृत्तांकनासाठी आवश्यक असलेल्या निकषांचे उल्लंघन केले आहे. बीबीसीच्या अहवालामुळे चीनच्या वांशिक एकजुटीची मोठी हानी झाली आहे’, या शब्दात चीनच्या ‘रेडिओ अ‍ॅण्ड टेलिव्हिजन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ यंत्रणेने बीबीसीवर टाकण्यात आलेल्या बंदीची माहिती दिली.

‘बीबीसी’

चीनकडून टाकण्यात आलेल्या या बंदीमागे उघुरांच्या मुद्यावरून होणार्‍या बदनामीबरोबरच ब्रिटनच्या सरकारकडून होणारी आक्रमक कारवाई हेसुद्धा कारण असल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन व प्रशासनाने गेल्या वर्षापासून चीनविरोधात अधिकाधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाव्हायरसच्या मुद्यावर चीनच्या चौकशीसाठी पुढाकार घेणार्‍या ब्रिटनने ‘५जी’, ‘हाँगकाँग’, ‘उघुरवंशिय’, ‘साऊथ चायना सी’मधील कारवाया यासारख्या मुद्यांवर उघडपणे चीनविरोधी धोरण स्वीकारले आहे. गेल्याच आठवड्यात ब्रिटनच्या माध्यम यंत्रणेने चीनची सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या ‘चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क’चा (सीजीटीएन) परवाना रद्द केला होता. त्याचवेळी चीनच्या माध्यमांसाठी काम करणार्‍या तीन पत्रकारांची हेरगिरीच्या कारणावरून हकालपट्टी झाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. ब्रिटनच्या संसदेत उघुरवंशियांवरील अत्याचाराला ‘वंशसंहार’ दर्जा देण्याच्या मुद्यावरून प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनाक्रमामुळे बिथरलेल्या चीनने ब्रिटीश वृत्तवाहिनीला धक्का दिल्याचे दिसत आहे.

चीनच्या या कारवाईवर ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी टीकास्त्र सोडले. ‘चीनचा निर्णय माध्यमस्वातंत्र्याला हानी पोहोचविणारी जुलमी कारवाई आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील चीनच्या प्रतिमेला अधिकच धक्के बसतील’, असे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी बजावले.

leave a reply