फ्रान्ससाठी भारत इंडो-पॅसिफिकमध्ये सुरक्षा पुरविणारा देश

- फ्रान्सचे रिअर ऍडमिरल जॅक्स फॅयार्ड

कोची – इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संपूर्ण सुरक्षा पुरविणारा विश्‍वासर्ह देश म्हणून फ्रान्स भारताकडे पाहत आहे, असे फ्रान्सच्या नौदलाचे रिअल ऍडमिरल जॅक्स फॅयार्ड यांनी म्हटले आहे. फ्रान्सकडून आयोजित केल्या जाणार्‍या ‘ला पेरूस’ या संयुक्त युद्धसरावात अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियासहीत भारतीय नौदल देखील सहभागी होत आहे. बंगालच्या उपसागरात होणारा हा सराव चीनला इशारा देण्यासाठी असल्याचे बोलले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सच्या रिअर ऍडमिरल जॅक्स फॅयार्ड यांनी भारताबाबत केलेले हे विधान लक्षवेधी ठरते.

ला पेरूस युद्धसरावासाठी भारताच्या कोची बंदरात फ्रेंच नौदलाच्या युद्धनौका दाखल झाल्या आहेत. यावेळी बोलताना रिअर ऍडमिरल जॅक्स फॅयार्ड यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतची फ्रान्सची भूमिका स्पष्ट केली. हिंदी महासागर क्षेत्रात सुमारे दहा लाख फ्रेंचांचा निवास आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फ्रान्सवर आहे. त्यामुळे फ्रान्स देखील या क्षेत्राचा भाग ठरतो, असे सांगून रिअर ऍडमिरल फॅयार्ड यांनी या क्षेत्रातील फ्रान्सचे फार मोठे हितसंबंध असल्याची बाब अधोरेखित केली.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सुरक्षा पुरविणारा विश्‍वासार्ह देश म्हणून फ्रान्स भारताकडे पाहत असल्याचे रिअर ऍडमिरल फॅयार्ड म्हणाले. याबरोबरच भारतीय नौदलाबरोबर फ्रेंच नौदलाचे सहकार्य वाढत असल्याची नोंद यावेळी फॅयार्ड यांनी केली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन व्हावे, या क्षेत्रात वाहतुकीचे स्वातंत्र्य असावे, अशी फ्रान्सची भूमिका आहे, असे सांगून या क्षेत्राच्या अस्थैर्याला जबाबदार असलेल्या कारवाया फ्रान्स खपवून घेणार नाही, असे संकेत या नौदल अधिकार्‍यांनी दिले आहेत.

म्हणूनच फ्रान्स या क्षेत्रातील देशांबरोबर नौदल सरावाचे आयोजन करीत असल्याचा दावा रिअर ऍडमिरल जॅक्स फॅयार्ड यांनी केला. सुएझ कालव्यापासून ते मलाक्काच्या आखातापर्यंतच्या फ्रेंच नौदलाच्या कारवायांची जबाबदारी रिअर ऍडमिरल जॅक्स फॅयार्ड यांच्याकडे आहे. अशा जबाबदार अधिकार्‍याने भारताकडून व्यक्त केलेली अपेक्षा उभय देशांमधील सामरिक पातळीवरील सहकार्य अधिकच दृढ झाल्याचे दाखवून देत आहे.

leave a reply