…तर युरोपिय देशांचा इंधनपुरवठा तोडण्यात येईल

- कतारने युरोपिय महासंघाला धमकावले

इंधनपुरवठा तोडण्यात येईलदोहा/ब्रुसेल्स – युरोपियन यंत्रणांनी कतारकडून मिळालेल्या पैशांसंदर्भातील चौकशी थांबविली नाही तर युरोपिय देशांचा इंधनपुरवठा तोडण्यात येईल, अशी धमकी कतारने दिली आहे. काही दिवसांपूर्वी युरोपियन संसदेच्या उपाध्यक्षा असणाऱ्या इव्हा कायली यांनी कतारकडून पैसे घेतल्याचे प्रकरण उघड झाले होते. या प्रकरणानंतर महासंघाने कतारच्या अधिकाऱ्यांवर तसेच व्हिसासंदर्भात काही निर्बंध लादले आहेत. त्याचवेळी कतारी अधिकाऱ्यांच्या चौकशीचेही संकेत दिले आहेत. यावर कतारकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली असून थेट इंधनपुरवठा तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपिय देशांनी रशियाकडून आयात होणाऱ्या इंधनवायूवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाकडून होणारी निर्यात जवळपास थांबली आहे. रशियन इंधनाची कमतरता भरून काढण्यासाठी युरोपिय महासंघाने अमेरिकेसह आखात तसेच आफ्रिकी देशांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात कतारची भूमिका निर्णायक असल्याचे मानले जाते. यावर्षी युरोपिय महासंघाने आयात केलेल्या इंधनवायूतील २५ टक्के वाटा कतारचा होता.

इंधनपुरवठा तोडण्यात येईलयुरोपातील आघाडीचा देश असणाऱ्या जर्मनीने कतारशी १५ वर्षांचा इंधनकरारही केला आहे. रशियाचा इंधनपुरवठा बंद झाल्यावर अमेरिका व कतार या दोन देशांवर युरोप विसंबून असेल, असे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर कतारमधील पैशांच्या देवाणघेवाणीचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. महासंघाने युरोपियन संसदेच्या उपाध्यक्षा कायली यांच्यासह चारजणांना ताब्यात घेतले आहे. कायली यांच्या कतार दौऱ्याची चौकशी करण्यात येत असून त्या कोणत्या नेत्यांना तसेच अधिकाऱ्यांना भेटल्या याचा तपास सुरू आहे.

फुटबॉल विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण समोर आल्याने कतार अडचणीत येण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे कतारने आक्रमक पवित्रा घेतला असून युरोपचा इंधनपुरवठा तोडण्याची धमकी दिली आहे. त्याचवेळी महासंघाने कतारी अधिकारी तसेच व्हिसासंदर्भात घेतलेल्या निर्णयांवरही पूर्वग्रहदूषित निर्णय असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, पुढील वर्षात युरोपिय महासंघाला इंधनाच्या आयातीसाठी तब्बल एक ट्रिलियन डॉलर्सचा भूर्दंड सहन करावा लागेल, असा दावा ‘ब्लूमबर्ग’ या वेबसाईटने केला आहे. रशियन इंधन बंद झाल्याने युरोपिय देशांना महागड्या दराने इंधनवायू खरेदी करावा लागणार असून त्याचे बिल एक ट्रिलियन डॉलर्स व त्याहून अधिक असेल, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.

leave a reply