रशियन इंधनावर ‘प्राईस कॅप’ लावण्यावर ‘जी-७’चे एकमत

- रशियाकडून खरमरीत इशारा

Oil Refinery Views As Oil Price Rides Virus Rollercoasterवॉशिंग्टन/मॉस्को – रशियाकडून निर्यात होणाऱ्या इंधनाच्या दरांवर मर्यादा घालण्याच्या प्रस्तावावर जी-७ गटाचे एकमत झाले. शुक्रवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाल्याचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात रशियाला युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धासाठी निधी मिळू नये यासाठी दरांवर मर्यादा घालण्यात येत असल्याचा खुलासा करण्यात आला. जी-७ या निर्णयापूर्वीच रशियाने इंधनाच्या दरांवरून खरमरीत इशारा दिला आहे. ‘प्राईस कॅप’ची अंमलबजावणी झाल्यास इंधन बाजारपेठेत प्रचंड अस्थैर्य निर्माण होईल, असे रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले.

कच्चे तेल व नैसर्गिक इंधनवायूच्या विक्रीतून रशियाला दररोज सुमारे एक अब्ज डॉलर्सचा निधी मिळत असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येतो. रशियाला इंधनविक्रीतून मिळणारा हा पैसा युक्रेनचे अधिकाधिक रक्त सांडणारा असल्याचा आरोपही युक्रेनने केला होता. या पार्श्वभूमीवर पाश्चात्य देशांनी रशियाच्या इंधनावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली होती. मात्र रशियन इंधनावर निर्बंध लादल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाचे भाव कडाडले होते. त्याचा सर्वाधिक फटका पाश्चिमात्य देशांनाच बसला होता. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे पाश्चिमात्य देशांमधील जनतेत असंतोष तीव्र होऊ लागला होता.

g7हा असंतोष टाळण्यासाठी अमेरिका व युरोपिय देशांनी धडपड सुरू केली असून ‘प्राईस कॅप’ हा त्याचाच भाग आहे. रशियन इंधनाच्या दरांवर निर्बंध लादल्यास इंधनाचे दर कमी होतील, अशी अपेक्षा पाश्चिमात्य देशांनी व्यक्त केली. दर कमी झाल्याने रशियाला इंधनातून मिळणारा महसूल कमी होईल व रशिया युक्रेनविरोधातील युद्ध अधिक काळ चालवू शकणार नाही, असे दावे पाश्चिमात्य देशांकडून करण्यात येत आहेत. जगातील इतर सहकारी देश रशियाविरोधातील ‘प्राईस कॅप’ची अंमलबजावणी करतील, असे जी-७ सांगत आहे. मात्र चीन व भारत यासारखे देश यात सहभागी होण्याची शक्यता नाही, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तसेच विश्लेषकांनी स्पष्टपणे बजावले आहे.

‘जी-७’च्या ‘प्राईस कॅप’वर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव यांनी आंतरराष्ट्रीय इंधनबाजारपेठेत तीव्र अस्थैर्य निर्माण होण्याचा इशारा दिला. त्याचवेळी जे देश व कंपन्या जी-७च्या निर्णयाची अंमलबजावणी करतील त्यांना रशिया इंधन पुरविणार नाही, असेही पेस्कोव्ह यांनी बजावले. रशियाचे इंधनमंत्री अलेक्झांडर नोव्हाक यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

leave a reply