जर्मन वर्तमानपत्राची चीनकडे १६२ अब्ज डॉलर्सच्या नुकसानभरपाईची मागणी

बर्लिन – अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपाननंतर आता जर्मनीतून चीनकडे नुकसानभरपाईची मागणी होत आहे. कोरोनाव्हायरसबाबत जगाला अंधारात ठेवणाऱ्या चीनने जर्मनीला १६२ अब्ज डॉलर्सची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जर्मनीच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केली. त्याचबरोबर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जगाला भयंकर संकटाच्या खाईत लोटत असल्याचा आरोप या जर्मन वर्तमानपत्राने केला आहे. तर जर्मन वर्तमानपत्राचे आरोप विद्वेषी असल्याची टीका चीनने केली आहे.

‘बिल्ड’ या जर्मनीतील आघाडीच्या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक ‘ज्युलियन रिशेल्ट’ यांनी गेल्या आठवड्यात कोरोनाव्हायरसच्या साथीसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व त्यांची कम्युनिस्ट राजवट जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. तसेच ‘व्हॉट चायना ओज् अस’ अर्थात चीन आपले किती देणे लागतो, असा सवाल करणारा लेख लिहून रिशेल्ट यांनी चीनने जर्मनीला तब्बल १६२ अब्ज डॉलर्सची (१४९ अब्ज युरो) नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली होती.

जर्मन वर्तमानपत्राने केलेल्या या नुकसानभरपाईच्या मागणीमुळे आणि चीनला धारेवर धरणाऱ्या जहाल भाषेच्या प्रयोगामुळे संतापलेल्या जर्मनीतील चीनच्या दुतावासाने सदर वर्तमानपत्र चीनच्या विरोधात विद्वेष निर्माण करीत असल्याची टीका केली. तसेच जगभरात फैलावलेल्या या साथीसाठी चीन जबाबदार नसल्याचा निर्वाळा चीनच्या दूतावासाने दिला. पण यानंतर ‘बिल्ड’ने अधिक जळजळीत टीका करुन चीनच्या राजवटीवर हल्ला तीव्र केला.

‘राष्ट्राध्यक्ष जिनपिंग तुम्ही, तुमचे सरकार आणि तुमच्या संशोधकाना या साथीच्या भीषण संसर्गाबाबत फार आधीपासून माहित होते. तरीही तुम्ही यापासून सर्व जगाला अंधारात ठेवले. पाश्चिमात्य तज्ज्ञांनी वुहानमधील साथीबाबत तुम्हाला विचारले तेव्हादेखील तुमच्या अधिकाऱ्यांनी याला उत्तर देण्याचे टाळले’, अशा सणसणीत शब्दात रिशेल्ट यांनी चीनने केलेल्या अपराधांची जाणीव या देशाला करुन दिली.

तर, ‘आपल्या जनतेवर नजर ठेवल्याशिवाय जिनपिंग तुम्ही राष्ट्राध्यक्ष देखील होऊ शकत नाही. तुम्ही प्रत्येक चिनी नागरिकांवर नजर ठेवता, पण तुमच्या शहरातून जगभरात फैलावलेल्या विषाणूवर तुम्ही साधी नजर ठेवू शकला नाहीत. तुम्ही तुमच्या राजवटीवर टीका करणारी वर्तमानपत्रे आणि वेबसाईट बंद करता, पण हा विषाणू जिथून बाहेर गेला, ती ठिकाणे बंद करीत नाही’, असे मर्मभेदी शेरे रिशेल्ट यांनी लगावले आहेत.

‘जिथे नागरिकांवर नजर ठेवली जाते, त्या देशात स्वातंत्र्य असणे शक्य नाही. जिथे स्वातंत्र्य नाही तिथे सर्जनशीलता अर्थात नवनिर्मिती नाही. नवनिर्मिती शक्य नसल्यामुळे चीन बुद्धिसंपदेच्या चोरीत सर्वात आघाडीवर असलेला देश आहे’, असे सांगून जुलियन रिशेल्ट यांनी चीनची मूलभूत समस्या जगासमोर मांडली.

आपल्या संपादकीय लेखाच्या अखेरीस जुलियन रिशेल्ट यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना अत्यंत खरमरीत संदेश दिला. तुमच्या निरंकुश सत्तेला आता हादरे बसू लागले याची कुजबूज चिनी जनतेमध्ये सुरू झाली आहे. कोरोनाव्हायरस जगात पसरण्यापूर्वी चीन हा आपल्या जनतेवर नजर ठेवणारा देश म्हणून जगभरात मशहुर होता. पण आता आपल्या नागरिकांवर जागता पहारा ठेवणारा आणि विषाणूग्रस्त बनून साऱ्या जगाला ही त्याचा संसर्ग देणारा देश, अशी चीनची ख्याती बनली आहे’, अशा शब्दात रिशेल्ट यांनी चीनला आरसा दाखविला आहे.

leave a reply