टोकिओ – जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी जपानचा दौरा करून पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेतली. यावेळी वर्षभर लांबलेल्या युक्रेनच्या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर कोसळलेले संकट आणि त्यामुळे आर्थिक समस्येच्या पार्श्वभूमीवर जर्मनी व जपानमध्ये आर्थिक सुरक्षा सहकार्यावर चर्चा पार पडली. त्याचबरोबर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा व चीनच्या वाढत्या प्रभावावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
चीनच्या कच्च्या मालावर जर्मनी मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. कोरोनाच्या काळात जगभरातील पुरवठा साखळी खंडीत झाल्यानंतर जर्मनीने चीनवरील हे अवलंबित्व कमी करण्यावर विचार सुरू केला होता. तर गेल्या वर्षभरापासून युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धानंतर पर्यायी व सुरक्षित पुरवठा साखळीवर विचार सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर, जर्मनीच्या चॅन्सेलरनी जपानचा दौरा करून आर्थिक सुरक्षाविषयक सहकार्य मजबूक करण्याला प्राधान्य देत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर द्विपक्षीय लष्करी, सुरक्षाविषयक सहकार्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा पार पडल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली.
गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये तब्बल २९८ अब्ज युरोची व्यापारी वाहतूक झाली होती. चीननंतर जपान हा जर्मनीचा आशियात दुसरा मोठा सहकारी देश ठरतो.
हिंदी