भारत व बांगलादेशमधील डिझेल पाईपलाईनचे उद्घाटन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत दोन्ही देशांमधील १३१ किलोमीटर इतक्या लांबीच्या पाईपलाईनचे उद्घाटन झाले. या पाईपलाईनमुळे भारत वर्षाकाठी सुमारे दहा लाख मेट्रिक टन इतके डिझेल बांगलादेशला पुरविणार आहे. सुमारे ३७७ कोटी रुपयांच्या या पाईपलाईनमुळे डिझेलच्या वाहतुकीवरचा खर्च कमी होणार आहे. याचा फार मोठा लाभ दोन्ही देशांना मिळणार असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी व पंतप्रधान शेख हसिना यांनी त्याचे स्वागत केले.

भारत व बांगलादेशमधील डिझेल पाईपलाईनचे उद्घाटनभारत व बांगलादेशच्या सहकार्याचे नवे पर्व सुरू झाल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी या पाईपलाईन प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. २०१८ साली या प्रकल्पाची पायाभरणी झाली. याआधी भारत रेल्वेमार्गाने बांगलादेशला डिझेलचा पुरवठा करीत होता. यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च व वाहतुकीदरम्यान होणारे कार्बनचे उत्सर्जन आता खूपच कमी झाले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी यावर समाधान व्यक्त केले. कोरोनाची साथ आलेली असताना देखील दोन्ही देशांना जोडणाऱ्या या पाईपलाईनचे काम थांबले नव्हते, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

आत्ताच्या काळात कित्येक विकसनशील देश अन्न व ऊर्जा सुरक्षेसाठी धडपडत आहेत. अशा परिस्थितीत भारत व बांगलादेशने हा पाईपलाईन प्रकल्प पूर्ण करून आपली ऊर्जासुरक्षा निश्चित केली. हे दोन्ही देशांमधील वाढत्या कनेक्टिव्हिटीचे उत्तम उदाहरण ठरते, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांची प्रशंसा केली. पंतप्रधान शेख हसिना यांनी दूरदृष्टी दाखवून १९६५ सालापर्यंत दोन्ही देशांमध्ये सुरू असलेली रेल्वेसेवा नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. ही रेल्वे सेवा सुरू झाली आणि कोरोनाची साथ आलेली असताना बांगलादेशला याचा फार मोठा लाभ मिळाला, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

कोरोनाची साथ असताना भारताने रेल्वेमार्गाने बांगलादेशला लसी व ऑक्सिजनचा पुरवठा केला होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत व बांगलादेश रेल्वे, वीज, परिवहन व डिजिटल मार्गाने एकमेकांना जितक्या अधिक प्रमाणात जोडले जातील, तितक्याच प्रमाणात उभय देशांची जनता परस्परांशी घट्टपणे बांधली जाईल, असा संदेश पंतप्रधानांनी दिला. भारत बांगलादेशला सध्या ११०० मेगावॅट इतकी वीज पुरवित आहे. भारत बांगलादेशमधील पेट्रोलियम क्षेत्रातील व्यापार एक अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेलेला आहे, अशी माहिती देखील पंतप्रधानांनी यावेळी दिली. हायड्रो कार्बन क्षेत्रातही भारत व बांगलादेशचे सहकार्य सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

अशारितीने बांगलादेशच्या विकासासाठी भारत योगदान देत आहे व बांगलादेशच्या प्रगतीवर भारताला समाधान वाटत आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. दरम्यान, भारताचे बांगलादेशबरोबरील हे सहकार्य धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरते. गेल्या काही वर्षांपासून चीन योजनाबद्धरित्या बांगलादेशवरील आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत होता. याद्वारे बांगलादेशचा भारताच्या विरोधात तळासारखा वापर करण्याची योजना चीनने आखली होती. मात्र पाकिस्तान व श्रीलंका या देशांचे चीनने केलेले शोषण पाहून सावध झालेल्या बांगलादेशच्या नेतृत्त्वाने चीनबरोबरील सहकार्यातून वेळीच माघार घेतली होती. यानंतरच्या काळात भारताचे बांगलादेशबरोबरील सहकार्य अधिकच दृढ झाले असून याचे लाभ दोन्ही देशांना मिळत आहेत.

हिंदी

 

leave a reply