जर्मनी व ब्रिटनचे नवे रणगाडे युक्रेनमध्ये दाखल

- रशियाकडून राजधानी किव्हसह ॲव्हडिव्हका व खेर्सनवर हल्ले

किव्ह/मॉस्को – गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले ब्रिटन व जर्मनीचे प्रगत रणगाडे युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी याची माहिती दिली असून ब्रिटन व जर्मनीनेही त्याला दुजोरा दिला आहे. रशियाला पराभूत करण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रगत शस्त्रास्त्रे द्यावीत, अशी मागणी युक्रेन गेल्या वर्षापासून करीत होता. त्याला अमेरिका व युरोपिय देशांनी प्रतिसाद दिला असून रणगाड्यांचा पुरवठा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचा दावा पाश्चिमात्य यंत्रणा व विश्लेषक करीत आहेत. मात्र पाश्चिमात्य देशांच्या रणगाड्यांमुळे संघर्षात फारसा फरक पडणार नसून ते सहजगत्या रशियन फौजांचे लक्ष्य होतील, असा इशारा रशियाकडून यापूर्वीच देण्यात आला होता.

जर्मनी व ब्रिटनचे नवे रणगाडे युक्रेनमध्ये दाखल - रशियाकडून राजधानी किव्हसह ॲव्हडिव्हका व खेर्सनवर हल्लेगेल्या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात युक्रेनने रशियाविरोधात प्रतिहल्ल्यांची मोहीम हाती घेतली होती. खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतातील मर्यादित यशापलिकडे रशियाला मोठा धक्का देण्यात ही मोहीम अपयशी ठरली होती. त्यानंतर युक्रेनने रशियाकडे असलेल्या प्रचंड शस्त्रसामर्थ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनला प्रगत शस्त्रांची आवश्यकता असल्याचा दावा केला होता. प्रगत शस्त्रे व यंत्रणा मिळाल्या तरच युक्रेनच्या रशियाविरोधातील प्रतिहल्ल्यांना यश मिळेल, असे युक्रेनी नेते व अधिकाऱ्यांकडून सातत्याने सांगण्यात येत होते.

अमेरिकेने युक्रेनच्या मागणीला प्रतिसाद दिला असला तरी पोलंड व बाल्टिक देश वगळता इतर आघाडीच्या युरोपिय देशांनी हात आखडता घेतला होता. युरोपिय देशांच्या या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करून युक्रेनने दबावतंत्राचा वापर सुरू केला होता. काही आठवडे सातत्याने दडपण टाकल्यानंतर जर्मनीने आपले प्रगत रणगाडे युक्रेनला पुरविण्याची घोषणा केली होती. जर्मनी व ब्रिटनचे नवे रणगाडे युक्रेनमध्ये दाखल - रशियाकडून राजधानी किव्हसह ॲव्हडिव्हका व खेर्सनवर हल्लेजर्मनीबरोबरच अमेरिका व ब्रिटननेही रणगाडे देण्याचे जाहीर केले होते. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यांच्यासह युरोपातील इतर देशांच्या माध्यमातून युक्रेनला जवळपास शंभरहून अधिक प्रगत रणगाड्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

त्यातील पहिली तुकडी नुकतीच युक्रेनमध्ये दाखल झाल्याचे मानले जाते. यात जर्मनी व पोर्तुगालकडून देण्यात आलेले 20हून अधिक ‘लिओपार्ड 2’ रणगाडे व ब्रिटनच्या ‘चॅलेंजर 2’ रणगाड्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अमेरिका ‘एम1 अब्राम्स टँक’ही देणार असून त्याची कालमर्यादा निश्चित झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रणगाड्यांबरोबरच जर्मनीने सशस्त्र वाहनेदेखील युक्रेनला दिल्याचे समोर आले आहे.

जर्मनी व ब्रिटनचे नवे रणगाडे युक्रेनमध्ये दाखल - रशियाकडून राजधानी किव्हसह ॲव्हडिव्हका व खेर्सनवर हल्लेयुक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी ब्रिटनच्या चॅलेंजर-2 रणगाड्यांसह अमेरिका व जर्मनीच्या सशस्त्र वाहनांसोबतचे एक छायाचित्रही प्रसिद्ध केले. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी, जर्मनीने ठरल्याप्रमाणे युक्रेनला रणगाडे पुरविल्याची माहिती दिली आहे. ब्रिटन व जर्मनीचे रणगाडे रशियन रणगाड्यांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे दावे करण्यात येत असून लवकरच पूर्व युक्रेनच्या आघाडीवर तैनात करण्यात येतील, असे संकेत युक्रेनच्या सूत्रांनी दिले.

दरम्यान, रशियाने सोमवारी रात्री व मंगळवारी राजधानी किव्हसह ॲव्हडिव्हका तसेच खेर्सनवर हल्ले चढविल्याचे उघड झाले. राजधानी किव्हवर सोमवारी रात्री इराणी ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. तर खेर्सन व ॲव्हडिव्हकामध्ये रॉकेटस्‌‍ व तोफांच्या सहाय्याने जबरदस्त मारा करण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

हिंदी

 

leave a reply