जागतिकीकरण व मुक्त व्यापार मरणासन्न अवस्थेत आहे

- सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘टीएसएमसी’च्या संस्थापकांचा इशारा

जागतिकीकरण व मुक्त व्यापारतैपेई – ‘गेल्या 27 वर्षात सेमीकंडक्टर क्षेत्र जगातील अनेक मोठ्या बदलांना सामोरे गेले आहे. सध्या जगाची भूराजकीय स्थिती वेगाने बदलते आहे. जागतिकीकरण व मुक्त व्यापार व्यवस्था मरणासन्न अवस्थेत आहे. अनेकांना वाटते या गोष्टी पूर्ववत होतील, पण स्थिती पूर्वपदावर येणार नाही, याची जाणीव असायला हवी’, असा इशारा सेमीकंडक्टर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘टीएसएमसी’चे संस्थापक मॉरिस चँग यांनी दिला. चँग यांच्या या विधानामागे अमेरिका व चीनमधील वाढती स्पर्धा आणि व्यापारयुद्धाची पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात सुरू केलेले व्यापारयुद्ध गेल्या वर्षभरात अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने तंत्रज्ञान क्षेत्रासह इतर प्रमुख क्षेत्रांमधील चिनी कंपन्यांवर बंदी टाकण्यास सुरुवात केली असून चिनी गुंतवणुकीवरही निर्बंध लादण्याचे निर्णय घेतले आहेत. त्याचवेळी चीनमध्ये सक्रिय असणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांना अमेरिकेत उत्पादन सुरू करण्यासाठी सवलती तसेच दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे.

जागतिकीकरण व मुक्त व्यापारसेमीकंडक्टर क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ने अमेरिकेत तब्बल 40 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीतून अमेरिकेच्या ॲरिझोना प्रांतात दोन मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. पहिल्या प्रकल्पात ‘चार नॅनोमीटर फॅब’चे उत्पादन घेण्यात येणार असून हा प्रकल्प 2024 साली सुरू होणार आहे. तर दुसऱ्या प्रकल्पात ‘तीन नॅनोमीटर फॅब’ची निर्मिती होणार असून हा प्रकल्प 2026 साली कार्यरत होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. यातील पहिल्या प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात चँग यांनी जागतिकीकरण व मुक्त व्यापार व्यवस्था संपुष्टात येत असल्याचे बजावले.

जागतिकीकरण व मुक्त व्यापारकोरोना साथीच्या काळात जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अमेरिका व युरोपातील आघाडीच्या उद्योगांना जबरदस्त फटका बसला होता. दूरसंचार, वाहन, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण या क्षेत्रातील कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले होते. अनेक कंपन्यांना उत्पादन निर्मिती थांबविणे भाग पडले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी अब्जावधी डॉलर्सच्या सवलतींची घोषणा करीत त्यांना अमेरिकेत उत्पादन सुरू करण्याचे आवाहन केले होते.

अमेरिकेच्या या आवाहनानंतर सेमीकंडक्टर क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी अमेरिकेत नव्या गुंतवणुकीची घोषणा केली असून ‘टीएसएमसी’ची गुंतवणूक त्यातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. ‘टीएसएमसी’च्या अमेरिकेतील गुंतवणुकीला चीन-तैवानमध्ये भडकणाऱ्या संभाव्य संघर्षाचीही पार्श्वभूमी आहे. पुढील काही वर्षात चीन तैवानवर हल्ला करेल, असे इशारे सातत्याने देण्यात येत आहेत. या हल्ल्याचा सर्वाधिक फटका सेमीकंडक्टर क्षेत्राला बसू शकतो. त्यामुळे अमेरिकेबरोबरच युरोपिय देशांनीही सेमीकंडक्टर्सची निर्मिती स्वदेशात व्हावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

हिंदी

leave a reply