सोन्याचे दर सात वर्षातील विक्रमी स्तरावर

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसच्या साथीचे आर्थिक दुष्परिणाम अधिक भयावह असतील, असा इशारा जगभरातील अर्थतज्ञ देत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञ ‘गीता गोपीनाथ’ यांनीही यासाथीमुळे जगावर १९३० साली आलेल्या महामंदीपेक्षा भयंकर संकट कोसळेल, असा इशारा दिला आहे. या आर्थिक पडझडीचे व अनिश्चिततेचे परिणाम आतापासूनच दिसू लागले असून सोन्याच्या दरात झालेली वाढ, याची साक्ष देत आहे.

अमेरिकी बाजारात सोने औंसामागे १७५५ डॉलर्सवर (एक औंस = २८.३५ ग्रॅम) गेले असून २०१२ सालानंतरची ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर सोन्याचे दर औंसामागे दोन हजार डॉलर्सच्याही वर जातील, असा दावा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ करीत आहेत.

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे जवळपास सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून याचा फटका सर्वात देशांना बसला आहे. पण सध्या अर्थव्यवस्था सावरण्याऐवजी यासाथीपासून आपल्या जनतेचा बचाव करणे, हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे जगभरातील प्रमुख देशांच्या सरकारांकडून सांगितले जात आहे. यामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे, अशा परिस्थितीत यासाथीच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो, अशी चिंता अर्थतज्ञांकडून व्यक्त केली जाते.

आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून नेहमीच सोन्याकडे पाहिले जाते. कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना सोन्याच्या दरात झालेली मोठी वाढ हेच दाखवून देत आहे. सध्या औंसामागे १७५५ डॉलर्सवर असलेले सोन्याचे दर येत्या काळात २००० डॉलर्सवर जातील असा दावा तज्ञ करीत आहेत. सोन्याचे दर वाढत असताना यासाथीचा फटका बसलेल्या थायलंडमधील बेरोजगारांनी आपल्याकडून सोने विक्रीस काढल्याचे दिसत आहे. याद्वारे आपल्या सध्याच्या गरजा भागवण्याचा या बेरोजगारांचा प्रयत्न आहे

सोन्याच्या विक्रीचे प्रमाण इतके वाढले आहे की त्याची गंभीर दखल थायलंडच्या पंतप्रधानांना घ्यावी लागली. सोने विकण्यासाठी गर्दी करू नका, इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड उपलब्ध नाही, असे आवाहन थायलंडच्या पंतप्रधान ‘प्रयुथ चान-ओचा’ यांना करावे लागले आहे. आपल्याकडील सोने निदान टप्प्याटप्प्याने विक्रीस काढा, असे पंतप्रधान ‘चान-ओचा’ यांनी सुचविले आहे.

leave a reply