ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा वाढता धोका

-विश्लेषक व माध्यमांचा दावा

Britain-economyलंडन – काही दिवसांपूर्वीच महागाईच्या अभूतपूर्व भडक्याची नोंद झाल्यानंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा नवे धक्के बसले आहेत. उद्योगक्षेत्रातील वाढीची तसेच ग्राहकांमधील मागणीची नोंद ठेवणाऱ्या निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. ब्रिटीश बाजारपेठांमधील किरकोळ विक्रीचे प्रमाणही खाली आले असून नागरिकांच्या हाती असणाऱ्या उत्पन्नाची टक्केवारीही नीचांकी स्तरावर पोहोचल्याचे सांगण्यात येते. हे सर्व घटक ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला लवकरच मंदीचा धक्का बसण्याचे संकेत देत आहेत, असा दावा विश्लेषक व माध्यमांनी केला.

काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमधील महागाईने चार दशकातील उच्चांकी स्तर गाठल्याचे समोर आले होते. या महागाईच्या भडक्यामागे ब्रेक्झिट व रशिया-युक्रेन युद्ध हे दोन प्रमुख घटक होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रिटनमधील इंधन, अन्नधान्ये, घरे यांच्या किमती आकाशाला भिडल्या असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे उघड झाले. दिवसेंदिवस याची तीव्रता वाढू लागली असून ब्रिटनचे उद्योगक्षेत्रही यातून सुटले नसल्याचे समोर येत आहे.

chart-ukconsumerमहागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दाखविणारे नवे अहवाल समोर आले आहेत. त्यात ब्रिटीश उद्योगक्षेत्रासह, किरकोळ विक्री, वस्तूंना असणारी मागणी, ग्राहकांची क्रयशक्ती, नागरिकांचे उत्पन्न या सर्वच गोष्टींवर परिणाम झाल्याचे दिसून येते. उद्योगक्षेत्रातील मागणी व उत्पादनाची वाढ दर्शविणारे निर्देशांक 50.8 व 49.6 पर्यंत खाली आले आहेत. नव्या मागणीत झालेली घट हा वर्षभरातील नीचांक असल्याचे सांगण्यात आले. उत्पादन क्षेत्रातील निर्देशांक गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक खालच्या पातळीवर आला आहे.

ब्रिटनमधील किरकोळ विक्री क्षेत्रात गेल्या सात महिन्यात चार टक्क्यांची घट झाली आहे. वाढत्या महागाईमुळे अन्नधान्यावर होणारा खर्च दर महिन्याला सुमारे दीड टक्क्यांनी घसरू लागला आहे. महागाईचा भडका उडत असताना सामान्य नागरिकांच्या वेतनात फारशी भर पडत नसून त्याचा फटका एकूण उत्पन्नाला बसला आहे.

ब्रिटनच्या नागरिकांच्या हाती असणाऱ्या उत्पन्नाची पातळी खालावली असून पुढील काही महिन्यात त्यात अजून घट होण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. ‘जीएफके’ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ‘कन्झ्युमर कॉन्फिडन्स’ उणे 41 अंशापर्यंत खाली आला आहे. हे सर्व घटक ब्रिटनमधील जनतेला ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ व त्यापाठोपाठ आर्थिक मंदीला तोंड द्यावे लागेल, याचे संकेत देत आहेत असे विश्लेषकांनी बजावले आहे. सरकार महागाई रोखण्यासाठी योग्य पावले उचलत नसल्याची नाराजीची भावना तीव्र होत असल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात आला आहे.

leave a reply