रिझर्व्ह बँक रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण होऊ देणार नाही

-आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा

नवी दिल्ली – येत्या काळात भारताची पतधोरणाशी निगडीत धोरणात्मक पावले इतर देशांच्या तुलनेत अधिक संतुलित असतील, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा यांनी व्यक्त केला आहे. भारतातील महागाई येत्या काही महिन्यात नियंत्रणात येईल, असा दावाही त्यांनी केला. त्याचवेळी भारतीय चलनात मोठे चढउतार होणार नाहीत, यासाठीही आरबीआय प्रयत्न करीत असल्याचे पात्रा यांनी स्पष्ट केले. जगातील इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य स्थिर असल्याचा दाखला त्यांनी यासाठी दिला. याशिवाय रुपया-रुबलमधील पेमेंट व्यवस्थेबाबत सरकार निर्णय घेईल, असेही यावेळी पात्रा यांनी अधोरेखित केले.

Michael-Patraभारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत गेल्या काही दिवसांमध्ये घसरुन 78 रुपयांच्या पुढे गेले आहे. जगभरात कित्येक देशांच्या चलनाचे मूल्य घसरल्याचे दिसून आले आहे. यामागे विविध कारणे आहेत. भारतीय रुपयामध्ये झालेल्या घसरणीवरून काही जण टीकाही करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पात्रा यांनी भारतीय रुपयांच्या मूल्यात डॉलर्सच्या तुलनेत झालेल्या घसरणीवर प्रकाश टाकला. ‘पीएचडीसीसीआय’ या उद्योगक्षेत्रातील संघटनेने ‘जिओ-पॉलिटिकल स्पिलओव्हर्स ॲण्ड इंडियन इकॉनॉमी’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

‘आरबीआयच्या पतधोरणात भारतीय चलनाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आले आहेत व पुढील काळातही यादृष्टीने निर्णय घेण्यात येतील. नजिकच्या काळात भारतीय रुपयाचे मूल्य काय असेल, हे आरबीआयला माहित नाही. त्याचवेळी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हलाही डॉलर्स कुठल्या पातळीवर असेल, हे माहित नाही’, असे पात्रा म्हणाले. पण भारतीय रुपयात मोठा चढउतार होणार नाही. कारण रुपयाच्या मूल्यात स्थिरतेसाठी आरबीआय काम करीत आहे आणि यासंबंधात सातत्याने पावले उचलली जात आहेत, असे आपण ठामपणे सांगू शकतो, असे पात्रा यांनी स्पष्ट केले.

भारतीय रुपया जगातील अशा चलनांच्या यादीत आहे, ज्याचे मूल्य फार कमी प्रमाणात घसरले आहे. ही बाब भारतीय रुपयाच्या मूल्यात झालेल्या घसरणीकडे नीटपणे पाहिले तर लक्षात येईल, असे पात्रा यांनी अधोरेखित केले. यामागे भारताकडील मजबूत परकीय गंगाजळीचे पाठबळ हे कारण आहे, असे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पात्रा यांनी ठळकपणे सांगितले. भारताकडे 600 अब्ज डॉलर्सहून अधिक परकीय गंगाजळी आहे. यामुळेच भारतीय चलनाचे मूल्य फार घसरू शकलेले नाही, असे पात्रा यांनी म्हटले आहे.

सध्या जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवित आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह, ब्रिटनच्या बँक ऑफ इंग्लंडसह अनेक बड्या देशांनी व्याजदर वाढीचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने दीड महिन्याच्या कालावधीत व्याजदर 0.9 टक्क्यांनी वाढविले. याकडे लक्ष वेधताना जागतिक अर्थव्यवस्था महागाईच्या संकटाचा समाना करीत असल्याचे पात्रा म्हणाले.

महागाई दर नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय पतधोरणात आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपर्यंत भारतातील महागाई दर नियंत्रणात आलेला असेल व सहा टक्क्यांपेक्षा खाली गेलेला असेल, असा विश्वास पात्रा यांनी व्यक्त केला. ‘सध्याची महागाई ही युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने भडकली आहे. पण लवकरच ही महागाई कमी होईल. भारतात मान्सून चांगला झाला, तर खाद्यान्नांचे भाव घसरतील. त्यामुळे या महागाईच्या संकटातून देश लवकर सावरेल. या पार्श्वभूमीवर येत्या काळात भारताच्या रिझर्व्ह बँकेचे पतधोरण हे इतर देशांच्या तुलनेत अधिक संतुलित असेल’, असा दावा आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पात्रा यांनी केला.

leave a reply