अमेरिकेत विघटनवादाला वाढते समर्थन

विघटनवादालावॉशिंग्टन – अमेरिकेत विघटनवादाला वाढते समर्थन मिळत असल्याचे समोर आले आहे. ‘द व्हाय अ‍ॅक्सिस’ या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे समर्थक विघटनासाठी आग्रही भूमिका घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी 2016 साली झालेल्या ‘ब्रेक्झिट’च्या सार्वमतानंतर अमेरिकेतील ‘टेक्सास’ तसेच ‘कॅलिफोर्निया’ या प्रांतांमध्ये स्वातंत्र्याची मागणी करणारे गट सक्रिय झाल्याचे समोर आले होते.

‘ब्राईट लाईन वॉच’ व ‘यु गव्ह’ या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून अमेरिकेतील विघटनवादाच्या मागणीचे चित्र उघड झाले आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागातील प्रांतांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या तब्बल 66 टक्के समर्थकांनी ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’पासून वेगळे होण्याच्या मुद्याला समर्थन दिले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाचे समर्थक नसलेल्या ‘इंडिपेंडंट’ विचारसरणीच्या नागरिकांपैकी 50 टक्के जणांनी वेगळे होण्याची मागणी उचलून धरली आहे.

विघटनवादालादक्षिणेकडील प्रमुख प्रांतांपैकी टेक्सास, फ्लोरिडा, मिसिसिपी, व्योमिंग व मिशिगन यातील रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य तसेच वरिष्ठ नेतेही वेगळे होण्याच्या मुद्यावर चर्चा करीत असल्याचे समोर आले आहे. पारंपारिक विचारसरणीचे समर्थन करणार्‍या प्रसारमाध्यमांमध्येही या मुद्याची दखल घेण्यात येत असल्याचा दावा ‘द व्हाय अ‍ॅक्सिस’ या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात करण्यात आला आहे. अमेरिकेतील दक्षिणेकडील प्रांतांबरोबरच पश्‍चिम अमेरिका व ईशान्य अमेरिकेतही विघटनाच्या मुद्याला पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

पश्‍चिम व ईशान्य अमेरिकेतील प्रांत डेमोक्रॅट पक्षाचे आधारस्तंभ मानले जातात. या भागातील 47 टक्के तसेच 39 टक्के डेमोक्रॅट समर्थकांनी वेगळे होण्याच्या मुद्याला समर्थन दिले आहे. स्वतंत्र विचारसरणीच्या 30 टक्क्यांहून अधिक लोकांनीही विघटनाला पाठिंबा दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यापूर्वी दक्षिणेकडील प्रांत तसेच रिपब्लिकन पक्षाचे मतदारच विघटनाच्या मुद्याला समर्थन देतात, असे मानले जात होते.

मात्र आता डेमोक्रॅट पक्ष तसेच स्वतंत्र विचारसरणीचे समर्थकही ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’पासून वेगळे होण्यास पाठिंबा देत असल्याचे उघड झाले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचा दावा ‘द व्हाय अ‍ॅक्सिस’चे पत्रकार व विश्‍लेषक ख्रिस्तोफर इन्ग्रॅहम यांनी केला आहे.

leave a reply