‘गुलेन मुव्हमेंट’प्रकरणी तुर्कीत शंभराहून अधिक जवानांची धरपकड

‘गुलेन मुव्हमेंट’अंकारा – २०१६ साली राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे सरकार उधळण्याचा कट आखणार्‍या ‘गुलेन मुव्हमेंट’शी संबंधित ११२ जवानांना तुर्कीच्या यंत्रणांनी अटक केली आहे. त्याचबरोबर एर्दोगन यांचे राजकीय विरोधक मेतिन गरशान यांनाही ताब्यात घेतले. येत्या काही तासात तुर्कीमध्ये ‘इंटरपोल’ची वार्षिक सभा होणार आहे. याचा फायदा घेऊन तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष आपल्या विरोधकांवर कारवाई करीत असल्याचा आरोप केला जातो.

पाच वर्षांपूर्वी तुर्कीमध्ये एर्दोगन यांचे सरकार उधळण्याचा कट आखण्यात आला होता. अमेरिकेने आश्रय दिलेला तुर्कीचा धार्मिक नेता फेतुल्ला गुलेन यामागे असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केला होता. २०१६ साली याप्रकरणी ३,३३८ जणांना अटक केली होती. यामध्ये तुर्कीच्या संरक्षणदलांमधील आजी-माजी अधिकार्‍यांबरोबर, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, शिक्षक, व्यावसायिक, विद्यार्थ्यांचा समावेश होता. गेली दोन वर्षे हे प्रकरण शांत झाले होते.

‘गुलेन मुव्हमेंट’मात्र गेल्या दोन दिवसांपासून तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी जवळपास २२ प्रांतात ११२ जणांवर कारवाई केली. यामध्ये तुर्कीच्या लष्करी सेवेत असलेल्या कर्नल, मेजरच्या हुद्यांवरील १५ अधिकारी व ३२ निवृत्त जवानांचा तसेच लष्करी विद्यालयातून बडतर्फ केलेल्या ६५ जणांचा समावेश आहे. अटक झालेले किंवा वॉरंट निघालेले सर्व राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याविरोधात राजकीय बंड पुकारणार्‍या ‘गुलेन मुव्हमेंट’शी जोडलेले असल्याचा दावा तुर्कीच्या यंत्रणांनी केला. याप्रकरणी आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जाते.

या अपयशी बंडाप्रकरणी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे विरोधक मेतिन गरशान यांना ताब्यात घेण्यात आले. ‘डेमोक्रसी अँड प्रोग्रेस पार्टी-डेवा’चे संस्थापक मेतिन गरशान यांच्यावर राजकीय हेरगिरीचा ठपका ठेवला आहे. गरशान राजकारणात उतरण्याआधी तुर्कीच्या लष्कराचे निवृत्त अधिकारी तसेच लष्करी विश्‍लेषक म्हणून ओळखले जात होते. राजकीय विरोधकांना जरब बसविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ही धरपकड सुरू केल्याची टीका होत आहे.

‘गुलेन मुव्हमेंट’राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांच्या सरकारला तुर्कीमध्ये हादरे बसू लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची लोकप्रियता घसरत चालली आहे. यासाठी एर्दोगन यांची चुकीची आर्थिक धोरणे आणि त्यांची एकाधिकारशाही जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. तुर्कीचे चलन लिरा आत्तापर्यंतच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी व्याजदरात केलेल्या आक्रमक कपातीमुळे लिराची घसरण झाल्याचा दावा केला जातो.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन तुर्कीला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकत नाहीत, असे तुर्कीतील ६४ टक्के नागरिकांना वाटत आहे. एका डॉलरमागे १२ लिरा मोजावे लागत आहेत. तर चार दिवसांपूर्वी हा दर ११ लिरा इतका होता. लिराच्या या घसरणीमुळे तुर्कीत प्रचंड चलनफुगवटा झाला असून महागाईचा निर्देशांक २० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम नसल्याची टीका तुर्कीची जनता करू लागली आहे. राजकीय विरोधक देखील तुर्कीमध्ये मध्यावधी निवडणूकांची मागणी करीत आहेत. अशा परिस्थितीत, राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी आपल्या विरोधकांवरच कारवाई सुरू करून आपण काही झाले तरी तुर्कीची सत्ता सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply