इस्रायल व अरब देशांमधील संरक्षणविषयक सहकार्याविरोधात हमास-हिजबुल्लाहचा इशारा

बैरूत – इस्रायल व अरब देशांमधील ‘नेगेव्ह’ परिषदेचा हमास व हिजबुल्लाह या दहशतवादी गटांनी धसका घेतला आहे. या परिषदेमुळे आखातात इस्रायलचे वर्चस्व प्रस्थापित होत असल्याचा दावा हमासने केला. तर इस्रायल आणि अरब देशांमध्ये घातक ठरणारे लष्करी सहकार्य विकसित होत असल्याची चिंता हमास व हिजबुल्लाहच्या प्रमुखांनी व्यक्त केली. म्हणूनच इस्रायलविरोधी गटांनी आपली आघाडी मजबूत करण्याची आवश्यकता असल्याची चिथावणी या दोन्ही दहशतवादी गटांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी बाहरिनची राजधानी मनामा येथे ‘नेगेव्ह’ची विशेष बैठक पार पडली. आर्थिक, व्यापारी सहकार्याबरोबरच सुरक्षेच्या आघाडीवरही इस्रायल व अरब देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आखात दौऱ्याआधी इस्रायल व अरब देशांमधील ही परिषद म्हणजे इराणविरोधी मोर्चेबांधणी असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या परिषदेवर प्रतिक्रिया येणे अपेक्षित होते. इराणशी संलग्न असलेल्या हमास, हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांनी सदर परिषदेवर चिंता व्यक्त केली.

गाझापट्टीतील हमासचा प्रमुख इस्माईल हनिया याने लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्ला याची भेट घेतली. या दोन्ही दहशतवादी संघटनांबरोबरच ‘पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद-पीजेआय’, ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन-पीएफएलपी’ आणि अन्य संघटनांचा समावेश होता. ‘नेगेव्ह परिषद म्हणजे अमेरिका व इस्रायलने आखलेले सर्वात धोकादायक कारस्थान ठरते. पॅलेस्टाईन आणि लेबेनॉनचा इस्रायलविरोधी संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते’, असा ठपका हमास, हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांनी ठेवला.

तर हमासच्या राजकीय गटाचा प्रवक्ता बासिम नईम याने नेगेव्ह परिषद म्हणजे इस्रायलचा मोठा डाव असल्याचा ठपका ठेवला. ‘या परिषदेमुळे आखातात इस्रायलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नेगेव्ह परिषद या क्षेत्राची सुरक्षा आणि स्थैर्य अबाधित ठेऊ शकत नाही. यामुळे फक्त विध्वंसच होईल. याने पॅलेस्टाईनचा मुद्दा आणि पॅलेस्टिनींचे अधिकार निकालात निघतील’, अशी टीका हमासच्या प्रवक्त्याने केली. तसेच नेगेव्ह परिषदेत सहभागी होऊन अरब देश इस्रायल पॅलेस्टिनींवर करीत असलेल्या अत्याचाराचे समर्थन करीत आहेत, असे ताशेरे नईम याने ओढले आहेत.

अरब देश इस्रायलबरोबर प्रस्थापित करीत असलेल्या सहकार्यावर याआधीही पॅलेस्टिनी संघटनांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. इराणने देखील ही आखाती क्षेत्रासाठी खतरनाक बाब ठरेल, असे इशारे अरब देशांना दिले होते. यामुळे अरब-आखाती देशांच्या इस्रायलबरोबरील सहकार्याविरोधात इराण व पॅलेस्टिनी संघटना एकत्र आल्याचे दिसत आहे.

leave a reply