पंजशीरमधील तालिबानच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले

- पाकिस्तानचे जवान ठार झाल्याचा दावा

हवाई हल्लेकाबुल – पंजशीरचा ताबा घेऊन अफगाणिस्तान स्वतंत्र केल्याची घोषणा तालिबानने केली होती. पाकिस्तानच्या हवाईदलाने तालिबानला पंजशीरच्या संघर्षात सहाय्य केल्याचा आरोप नॉर्दन अलायन्सचे नेते अहमद मसूद यांनी केला होता. पाकिस्तानने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते. पण आता तालिबानने ताब्यात घेतलेल्या पंजशीरमधील ठिकाणांवर हवाई हल्ले झाल्याच्या बातम्या येत आहेत. या हवाई हल्ल्यांमध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांबरोबरच पाकिस्तानचे जवानही ठार झाल्याचे बोलले जाते.

अफगाणिस्तानातील पंजशीर हा तालिबानच्या सरकार स्थापनेतील सर्वात मोठा अडसर मानला जातो. तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतरही नॉर्दन अलायन्सने पंजशीर स्वतंत्र ठेवले होते. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या भविष्यासाठी तालिबानविरोधी गटाने आणि जनतेने या संघर्षात सहभागी व्हावे, असे आवाहन नॉर्दन अलायन्सचा नेता अहमद मसूद यांनी केले होते. यानंतर तालिबानने पंजशीरचा ताबा घेण्यासाठी जोरदार मोहिम छेडली होती. पण पंजशीरच्या खोर्‍यांमधील नॉर्दन अलायन्सची आघाडी तोडून काढणे तालिबानसाठी मोठे आव्हान ठरत होते.

हवाई हल्लेअशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या हवाईदलाने तालिबानला पंजशीरमधील संघर्षात सहाय्य केल्याचा आरोप अहमद मसूद यांनी केला. पाकिस्तानी हवाईदलाच्या ड्रोनने पंजशीरमध्ये हवाई हल्ले चढविले. त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराचे स्पेशल फोर्सेसचे जवानही पंजशीरमध्ये दाखल झाल्याचे दावे केले जात होते. पंजशीरमधील संघर्षात पाकिस्तानने घेतलेल्या या सहभागावर इराणने देखील टीका केली होती. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कारभारात हस्तक्षेप करू नये, असे इराणने फटकारले होते.

पाकिस्तानने आपल्यावरील हे आरोप फेटाळले. पण मंगळवारी काही माध्यमांनी पंजशीरमधील तालिबानच्या तळांवर झालेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे जवान ठार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली. तालिबानच्या पाच तळांवर हे हल्ले चढविले गेले. कुठल्या देशाच्या विमानांनी हल्ले चढविले, याची कुठलीच माहिती प्रसिद्ध झालेली नाही. तसेच नॉर्दन अलायन्सने देखील या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या बातमीमुळे पंजशीरमधील संघर्ष अजूनही सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply