रियाध/सना – सौदी अरेबियाची राजधानी रियाधसह एकूण सहा शहरांना हौथी बंडखोरांनी लक्ष्य केले. सौदीच्या अराम्को कंपनीच्या इंधनप्रकल्पांवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याची माहिती हौथींनी दिली. यापैकी जेद्दा येथील प्रकल्पात इंधनसाठ्याचा मोठा भडका उडाला. हौथींचे हे हल्ले जागतिक इंधन सुरक्षा धोक्यात टाकणारे आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा कणा कमकुवत करणारी असल्याची जळजळीत टीका अरब देशांच्या लष्करी आघाडीने केली. यानंतर अरब देशांनी हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवून त्याला प्रत्युत्तर दिले.
गेल्या सहा दिवसात हौथी बंडखोरांनी सौदीच्या अराम्को कंपनीच्या इंधनप्रकल्पांवर चढविलेला हा दुसरा हल्ला ठरतो. रविवारी हौथी बंडखोरांनी सौदीच्या रेड सीजवळचा इंधनप्रकल्प तसेच तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यांमध्ये अराम्को कंपनीचे विशेष नुकसान झाले नव्हते. पण हौथी बंडखोरांचे वाढते हल्ले इंधनाच्या उत्पादनावर परिणाम करणारे ठरत असल्याचा इशारा सौदीने दिला होता. अमेरिका व मित्रदेशांनी हौथींचे हे हल्ले वेळीच रोखले नाही तर इंधनाची निर्यात बाधित होऊ शकते, असा इशारा सौदीने दिला होता.
बायडेन प्रशासनाने हौथींच्या या हल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. यानंतर शुक्रवारी या इराणसंलग्न बंडखोर संघटनेने नव्याने सौदीच्या आणखी शहरांवर ड्रोन्स तसेच क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले. राजधानी रियाधसह सौदीच्या जेद्दा, जिझान, नजरान, रास तनूरा आणि राबिघ या शहरांमधील अराम्कोच्या इंधन प्रकल्पांना हौथींनी लक्ष्य केले. सौदी अरेबियाचे अरब मित्रदेश युएई, इजिप्त, बहारिन या देशांनी हौथींच्या या हल्ल्यांवर जोरदार टीका केली. तर अरब देशांच्या लष्करी आघाडीने पाश्चिमात्य देशांना इशारा दिला.
‘इंधनप्रकल्पांवर हल्ले चढवून हौथी बंडखोर इंधन सुरक्षा धोक्यात आणून जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत’, असे अरब देशांच्या लष्करी आघाडीचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी बजावले. यानंतर अरब देशांच्या लष्कराने येमेनमधील हौथींच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले चढविले. यामध्ये हौथींचा मोठा तळ नष्ट केल्याचा दावा केला जातो. तर अमेरिका, ब्रिटन या देशांनी सौदीवरील या हल्ल्यांसाठी हौथी बंडखोरांवर टीका केली.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे कोंडीत सापडलेल्या युरोपिय देशांसाठी सौदी अरेबियाने इंधनाचे उत्पादन वाढवावे, यासाठी बायडेन प्रशासन सौदीवर दबाव वाढवित आहे. पण सौदीने अमेरिकेची ही मागणी अमान्य केली आहे. यानंतर हौथी बंडखोरांच्या सौदीवरील ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे, ही लक्षणीय बाब ठरते.