युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मुलाचे फंडिंग – रशियन संरक्षण मंत्रालयाचा आरोप

मॉस्को/लंडन – ‘अँथ्रॅक्स’ या विषाणूचा वापर जैविक शस्त्रासारखा करण्यावर संशोधन करीत असलेल्या युक्रेनमधल्या प्रयोगशाळांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या मुलाकडून फंडिंग मिळत होते. हंटर बायडेन यांच्या ‘रोझमॉंट सिनिका’ या कंपनीने युक्रेनच्या प्रयोगशाळेत तब्बल पाच लाख डॉलर्सची गुंतवणूक केली होती, असा गंभीर आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला. रशियन जवानांनी युक्रेनमधील प्रयोगशाळांमधून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रातून ही माहिती उघड झाल्याचे रशियाने म्हटले आहे.

या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, ६ मार्च रोजी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमध्ये अमेरिकेच्या ३० हून अधिक जैविक प्रयोगशाळा कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती जगासमोर प्रसिद्ध केली. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन या प्रयोगशाळांमध्ये प्लेग, अँथ्रॅक्स, कॉलरा व इतर भयानक विषाणूंवर संशोधन करीत असल्याचा आरोप रशियाने केला होता. २४ फेब्रुवारी रोजी रशियन लष्कर युक्रेनमध्ये घुसल्यानंतर पेंटॅगॉनने या प्रयोगशाळांमधील कागदपत्रे व पुराव्यांची जाळपोळ सुरू केली होती. तरीही याचे काही पुरावे आपल्या हाती सापडल्याचा दावा रशियाने केला होता.

बायडेन प्रशासनाने रशियाच्या या आरोपांवर गोंधळ वाढविणारी प्रतिक्रिया दिली होती. या प्रयोगशाळांमधील संशोधन रशियन लष्कराच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी जाळपोळ केल्याचे अमेरिकेने मान्य केले. पण येथे कुठल्याही प्रकारे जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती सुरू नव्हती, असा दावा बायडेन प्रशासनाने केला. त्यानंतर रशियाने संयुक्त राष्ट्रसंघासमोर हा मुद्दा उपस्थित करुन यासंबंधी आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हटले होते. दोन दिवसांपूर्वी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत मोठी खळबळ उडविणारी माहिती माध्यमांसमोर उघड केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन तसेच सत्ताधारी डेमोक्रॅट पक्ष आणि अमेरिकेतील विख्यात उद्योजक युक्रेनमधील या जैविक प्रयोगशाळेशी जोडलेले असल्याचा दावा रशियाने केला. अँथ्रॅक्स या विषाणूचा शस्त्रासारखा वापर करण्याच्या संशोधनात सहभागी असणार्‍या युक्रेनमधील प्रयोगशाळांना हंटर बायडेन आणि इतर संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात निधी पुरविला जात होता.

सदर व्यवहारांचे ईमेल्स तसेच इतर कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख असल्याचे रशियाने म्हटले आहे. दरम्यान, हंटर बायडेन यांची युक्रेनमध्ये अवैध गुंतवणूक असल्याचे आरोप याआधी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रुडी ग्युलियानी यांनी केला होता. हंटर बायडेन यांचा लॅपटॉप ताब्यात घेण्याची मागणी ग्युलियानी यांनी केली होती.

leave a reply