अमेरिकेतील शेकडो बँका दिवाळखोर बनल्या आहेत

- आघाडीचे अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेतील शेकडो बँका आधीच दिवाळखोरीत गेल्या आहेत, असा खळबळजनक इशारा आघाडीचे अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांनी दिला. ‘प्रोजेक्ट सिंडिकेट’ अंतर्गत लिहिलेल्या एका लेखात रुबिनी यांनी, अमेरिकी बँकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या भांडवलापैकी जवळपास ८० टक्के निधी अनिश्चित तोट्याचा भाग (अनरिअलाईझ्ड् लॉसेस) म्हणून गमवावा लागू शकतो, असेही बजावले. गेल्या महिन्यात अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत अमेरिकेतील तीन बँका दिवाळखोरीत गेल्या होत्या. त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील संकटाचा व संभाव्य आर्थिक मंदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अमेरिकेतील शेकडो बँका दिवाळखोर बनल्या आहेत - आघाडीचे अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांचा इशारामार्च महिन्यात अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली बँक’, ‘सिल्व्हरगेट’ व ‘सिग्नेचर बँक’ या बँका अवघ्या सात दिवसात कोसळल्या होत्या. त्यानंतर ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ ही बँकही आर्थिक अडचणीत आली होती. अमेरिकेतील बायडेन प्रशासनासह देशातील आघाडीच्या बँकांनी अर्थपुरवठा करून सदर बँकेला सावरले असले तरी बँकेवरील संकट पूर्णपणे टळलेले नाही. अशा रितीने एकापाठोपाठ बँका कोसळण्याची घटना यापूर्वी २००८ साली घडली होती. त्यानंतर अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा जबरदस्त फटका बसला होता. त्यामुळे गेल्या महिन्यात बँकिंग क्षेत्रात झालेली पडझडही लक्ष वेधून घेणारी ठरते.

या पडझडीनंतर अमेरिकेतील विविध अर्थतज्ज्ञ व विश्लेषकांनी बँकिंग क्षेत्रातील संकटाच्या परिणामांकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेतील प्रमुख विद्यापीठांमध्ये सक्रिय असणाऱ्या चार अर्थतज्ज्ञांनी बँकिंग क्षेत्राबाबत एक अहवालही प्रसिद्ध केला होता. त्यात अमेरिकेतील २०० बँका संकटाच्या उंबरठ्यावर असून खातेदार व इतर ग्राहकांचे तब्बल ३०० अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते असा इशारा देण्यात आला होता. अमेरिकेतील शेकडो बँका दिवाळखोर बनल्या आहेत - आघाडीचे अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांचा इशाराअमेरिकेच्या बँकांनी आपले भांडवल व मालमत्ता ज्या प्रमाणात दाखविली आहे ती प्रत्यक्षात त्यापेक्षा दोन लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर्सनी कमी असल्याचा धक्कादायक दावा यात करण्यात आला होता.

२००८ साली आलेल्या मंदीचे यशस्वी भाकित करणारे अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांनी, ही पुढे होणाऱ्या रक्तपाताची निव्वळ सुरुवात आहे अशा खरमरीत शब्दात बजावले होते. रुबिनी यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका लेखात बँकिंग क्षेत्रातील संकटाची व्याप्ती प्रचंड असल्याकडे लक्ष वेधले आहे. अमेरिकी बँकांनी फेडरल रिझर्व्हच्या कर्जरोख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याची जाणीव रुबिनी यांनी आपल्या लेखात करून दिली आहे.

फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविल्यामुळे बँकांना कर्जरोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणारा नफा घटला आहे. त्यामुळे बँकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ही बाब अनेक बँकांनी आपल्या ताळेबंदात उघडपणे दाखवलेली नाही. पण गेल्या काही महिन्यात समोर आलेल्या विविध आकडेवारींच्या माध्यमातून हे नुकसान जवळपास ६२० अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेतील शेकडो बँका दिवाळखोर बनल्या आहेत - आघाडीचे अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांचा इशारापण यात बँकांच्या इतर गुंतवणुकीचे घसरलेले मूल्य जमेस धरलेले नाही. ते जमेस धरल्यास आर्थिक फटक्याची आकडेवारी १.७५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचू शकते. ही रक्कम अमेरिकी बँकाकडे असलेल्या भांडवल्याच्या जवळपास ८० टक्के इतकी भरते, असा दावा रुबिनी यांनी केला.

‘सर्व आकडेवारी एकत्र केली तर अमेरिकेतील जवळपास सगळ्याच बँका तांत्रिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या जवळ गेल्याचे दिसते. त्यातील शेकडो दिवाळखोरीत गेल्याही आहेत’, असे अर्थतज्ज्ञ रुबिनी यांनी बजावले. यापूर्वी २००८-०९ साली अमेरिकेसह जगात आलेल्या आर्थिक मंदीच्या काळात बँका मोठ्या प्रमाणात बुडाल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती होण्याचे संकेत रुबिनी यांच्या इशाऱ्यातून मिळत आहेत. त्यामुळे जागतिक मंदीचे सावट अधिकच गडद झाल्याचे दिसत आहे.

leave a reply