रशियन युद्धनौकांवर हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात होणार

मॉस्को – अमेरिका व ब्रिटनसह इतर नाटो देशांबरोबर सागरी क्षेत्रात वारंवार उडणाऱ्या खटक्यांच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने आपल्या नौदलाची क्षमता अधिक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी रशियन संरक्षणदलाने युद्धनौकांवर हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्याबाबत करार केल्याची माहिती दिली आहे. त्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियाच्या शिपयार्डस्‌मध्ये दोन प्रगत युद्धनौका व चार पाणबुड्यांची निर्मिती सुरू असल्याचे जाहीर केले आहे.

युरोपिय देशांनी नॅव्हॅल्नी प्रकरण व युक्रेनच्या मुद्यावर रशियाविरोधी भूमिका घेऊन निर्बंध लादले आहेत. त्याचवेळी रशियन अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा ठपका ठेऊन त्यांची हकालपट्टी करण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे रशिया व युरोपमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. तर अमेरिका व रशियामध्ये सायबरहल्ले तसेच युरोपातील वाढत्या संरक्षणतैनातीच्या मुद्यावरून जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर रशिया अधिकाधिक आक्रमक होत असून संरक्षणक्षेत्राच्या आधुनिकीकरणावर भर देत असल्याचे समोर येत आहे. गेल्या महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियन नौदलाच्या स्थापनेला 325 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शत्रूदेशांना खणखणीत इशारा दिला होता. ‘रशिया व रशियन हितसंबंधांचे रक्षण करण्यास रशियन नौदल पूर्णपणे सज्ज आहे. शत्रू पाण्याखाली, जमिनीवर अथवा हवेत कुठेही असला तरी नौदल त्याचा माग काढू शकते. आवश्‍यकता पडल्यास शत्रूला चुकवता येणार नाही असा जबरदस्त दणका देण्यासही रशियन नौदल सक्षम आहे’, असे पुतिन यांनी बजावले होते.

या पार्श्‍वभूमीवर, शुक्रवारी रशियन संरक्षणदलाने केलेला करार महत्त्वाचा मानला जातो. नव्या करारानुसार, पुढील वर्षापासून रशियन युद्धनौकांवर ‘झिरकॉन’ ही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. ही क्षेपणास्त्रे विमानवाहू युद्धनौकांचा वेध घेण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात येते. जुलै महिन्यात यासंदर्भातील चाचणीही यशस्वी झाल्याची माहिती संरक्षणदलाकडून देण्यात आली. क्षेपणास्त्रांच्या तैनातीबरोबरच रशियन नौदलात नवीन युद्धनौका व पाणबुड्याही सामील होणार असल्याचे समोर येत आहे.

नौदलाची क्षमता वाढत असतानाच रशियाच्या ब्रिटनमधील राजदूतांनी नवा इशारा दिला आहे. ब्रिटनने जून महिन्याप्रमाणे पुन्हा रशियन हद्दीत हालचाली केल्या तर त्याचे गंभीर परिणाम ब्रिटनला भोगावे लागतील, असे राजदूत आंद्रे केलिन यांनी बजावले. जून महिन्यात युद्धनौका पाठविणाऱ्या ब्रिटनने रशियन नियम व कायद्यांचे उल्लंघन केले होते, असा आरोपही केलिन यांनी यावेळी केला.

जून महिन्यात, ब्र्रिटनची युद्धनौका ‘एचएमएस डिफेन्डर’ने क्रिमिआनजिकच्या सागरी हद्दीतून प्रवास केला होता. त्यावेळी रशियन गस्तीनौकांनी ब्रिटीश युद्धनौकेचा पाठलाग करून ‘वॉर्निंग शॉट्स’ झाडले होते. रशियाच्या लढाऊ विमानांनी ब्रिटीश युद्धनौकेला रोखण्यासाठी समुद्रात बॉम्ब्स टाकले असा दावाही रशियन संरक्षणदलाने केला होता. मात्र ब्रिटनने यासंदर्भातील रशियाचे सर्व दावे फेटाळून लावले होते. मात्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या संपूर्ण प्रकरणामागे अमेरिकेची चिथावणी होती, असा आरोप केला होता. ब्रिटीश युद्धनौकेच्या मोहिमेनंतर रशियाने ‘ब्लॅक सी’मधील नाटो व इतर देशांचे सराव तसेच नाविक हालचाली गांभीर्याने घेतल्या आहेत. रशियन राजदूतांचा इशारा त्याचाच भाग दिसत आहे.

leave a reply