वॉशिंग्टन/तैपेई/कॅनबेरा – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला लष्करी सज्जतेचे आदेश दिले आहेत. लवकरच चीन तैवानवर हल्ला चढविल. असे झाल्यास अमेरिका तैवानच्या सुरक्षेसाठी धाव घेईल, असा दावा अमेरिकेचे नेते करीत आहेत. पण चीनने तैवानवर हल्ला केलाच तर अमेरिका व चीन यांच्यात मोठा संघर्ष भडकेल व त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये अंतराळात युद्ध पेट घेईल, असा इशारा पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते व विश्लेषक तैवानवर हल्ल्याचे इशारे देत आहेत. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग देखील तैवान लवकरच चीनमध्ये विलीन होईल, असे जाहीरपणे सांगत आहेत. चीनच्या नौदलाने तैवानच्या आखाताजवळच्या हालचाली वाढविल्या आहेत. चीन आपल्या नौदलाचा विस्तार करीत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन नौदलाच्या अधिकाऱ्यांनी लक्षवेधी विधान केले आहे.
‘येत्या काळात चीनने तैवानवर हल्ला चढविलाच तर अमेरिका या युद्धात सहभागी होईल. यामुळे युद्धाचा मोठा भडका उडेल. असे झाल्यास अमेरिका व चीन परस्परांची अचूक हल्ले चढविणारी क्षेपणास्त्रे निकामी करण्यासाठी लष्करी उपग्रहांवर हल्ले चढवतील. यामुळे तैवान युद्धाचे पर्यावसन अंतराळातील युद्धात होईल’, अशा इशारा एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला.
तैवानवरील हल्ल्यानंतर अमेरिका व चीनमध्ये सायबर युद्ध भडकण्याचा इशाराही काही लष्करी अधिकारी देत आहेत. चीनबरोबर युद्ध भडकलेच तर सात दिवसात अमेरिकेकडील शस्त्रसाठा संपुष्टात येईल, असा इशारा ‘इंडो-पॅसिफिक कमांड-इंडोपॅकॉम’ने दिला. हे टाळायचे असेल तर इंडोपॅकॉमच्या बजेटमध्ये वाढ करण्यात यावी, तसेच २०२७ सालापर्यंत अमेरिकेची अतिप्रगत हवाई आणि सायबर सुरक्षा यंत्रणा एकिकृत करावी, असेही इंडोपॅकॉमने सुचविले. २०२७ साली चीनने तैवानवर हल्ल्याची योजना आखली आहे. त्यामुळे त्याआधीच अमेरिकेने आपली लष्करी सज्जता वाढवावी, असे इंडोपॅकॉमने म्हटले आहे. दरम्यान, तैवानच्या प्रश्नावरून अमेरिका व चीनमध्ये युद्ध भडकेलच तर या युद्धातील ऑस्ट्रेलियाच्या सहभागाबाबत काही निश्चितपणे सांगता येणार नाही, असा धक्कादायक दावा ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांनी केला. याआधी ऑस्ट्रेलियाने चीनच्या विरोधात तैवानला आपला पाठिंबा असेल, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेत झालेला बदल लक्षवेधी ठरतो.