फेडरल रिझर्व्ह व ‘बँक ऑफ इंग्लंड’ने केलेल्या व्याजदरवाढीमुळे शेअरबाजारात पडझड

वॉशिंग्टन/लंडन – अमेरिका व युरोपमधील बँकिंग क्षेत्रात आलेल्या संकटामुळे गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांना अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला आहे. याची जाणीव असतानाही जगातील आघाडीच्या मध्यवर्ती बँकांनी पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. गेल्या २४ तासात अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ व ब्रिटनची मध्यवर्ती बँक असणाऱ्या ‘बँक ऑफ इंग्लंड’ने व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे अमेरिका व युरोपसह आशियाई शेअरबाजारांमध्ये पुन्हा एकदा पडझड झाली.

फेडरल रिझर्व्ह व ‘बँक ऑफ इंग्लंड’ने केलेल्या व्याजदरवाढीमुळे शेअरबाजारात पडझडअमेरिकेत एकापाठोपाठ एक बँका दिवाळखोरीत जात असून पुढील काळात ५० ते २०० बँकांना जबर नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा अर्थतज्ज्ञ व विश्लेषकांनी दिला आहे. गेल्या काही दिवसात बुडालेल्या बँकांच्या अपयशामागे फेडरल रिझर्व्हचे व्याजदरवाढीचे धोरण प्रमुख कारण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे नव्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह दरवाढीचा निर्णय टाळू शकते, असे संकेत देण्यात आले होते.

मात्र बुधवारी फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात ०.२५ टक्के वाढ करीत असल्याचे जाहीर केले. या वाढीनंतर अमेरिकेतील व्याजदर पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ही घोषणा करताना पॉवेल यांनी अमेरिकेतील महागाईचा दर दोन टक्क्यांपर्यंत खाली आणणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट राहील व ते गाठण्याचा मार्ग अडथळ्यांचा असल्याचे बजावले. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील संकटाची व्याप्ती वाढत असतानाही फेडरल रिझर्व्ह आपले दरवाढीचे धोरण कायम ठेवेल, असे संकेत मिळत आहेत. बुधवारी फेडरल रिझर्व्हने केलेली घोषणा ही गेल्या वर्षभरात करण्यात आलेली नववी व्याजदरवाढ ठरते.

फेडरल रिझर्व्ह व ‘बँक ऑफ इंग्लंड’ने केलेल्या व्याजदरवाढीमुळे शेअरबाजारात पडझडफेडरल रिझर्व्हच्या या निर्णयानंतर अमेरिकी शेअरबाजारात जबरदस्त घसरण झाली. अमेरिकेतील आघाडीचा शेअर निर्देशांक डो जोन्स तब्बल ५३० अंशांनी कोसळला. नॅस्डॅकमध्ये १९० अंकांची तर ‘एसॲण्डपी५००’मध्ये ६५ अंकांची घसरण झाली. युरोपिय शेअरबाजारांमध्ये बँकेच्या समभागांनाही याचा फटका बसला. ‘एसएक्स७पी’ निर्देशांक एक टक्क्याने खाली आला. जर्मनीच्या ‘डॉईश बँक’ व ‘कॉमर्झबँक’च्या निर्देशांकात मोठी घसरण झाली. ब्रिटनमधील शेअरनिर्देशांकही खाली आले आहेत.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हपाठोपाठ ब्रिटनची मध्यवर्ती बँक असणाऱ्या ‘बँक ऑफ इंग्लंड’नेही व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यानंतर ब्रिटनमधील व्याजदर ४.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. फेडरल रिझर्व्ह व ‘बँक ऑफ इंग्लंड’ने केलेल्या व्याजदरवाढीमुळे शेअरबाजारात पडझडदोन दिवसांपूर्वी ब्रिटनमधील महागाई निर्देशांकाची आकडेवारी जाहीर झाली होती. फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनमधील महागाई १० टक्क्यांवर गेल्याचे समोर आले होते. त्यामुळे ‘बँक ऑफ इंग्लंड’ला व्याजदरात वाढीचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगण्यात येते.

गेल्या काही महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीसदृश वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक, संयुक्त राष्ट्रसंघटना, जागतिक व्यापार संघटना यासह अनेक आघाडीच्या संस्था तसेच वित्त क्षेत्रातील कंपन्यांनी २०२३ सालात मंदीचा फटका बसेल, असे भाकित वर्तविले आहे. त्यासाठी जगातील प्रमुख देशांकडून व्याजदरात केली जाणारी वाढ हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. मात्र तरीही अमेरिका, ब्रिटन व इतर आघाडीच्या देशांकडून महागाईचा भडका रोखण्याचे कारण पुढे करून व्याजदरातील वाढीचे सातत्याने समर्थन करण्यात येत आहे.

हिंदी English

 

leave a reply