इम्रान खान यांचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर गंभीर आरोप

लाहोर – जामीनावर सुटका झाल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर घणाघाती टीकेचे सत्र सुरू केले आहे. लष्करप्रमुख जनरल मुनीर हे पाकिस्तानचा पैसा लुटून बाहेर पाठविणाऱ्या नेत्यांच्या मागे उभे राहून आपल्याला लक्ष्य करीत आहेत, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराच्या ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स-आयएसपीआर’ने आपल्यावर केलेले आरोप राजकीय असून आयएसपीआरने आता राजकीय पक्षच सुरू करावा, असा टोला इम्रान खान यांनी लगावला आहे.

इम्रान खान यांचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर गंभीर आरोपपाकिस्तानी लष्करावर केलेली टीका म्हणजे देशद्रोह ठरत नाही. 1971 साली त्यावेळच्या ईस्ट पाकिस्तानमधले वातावरण पूर्णपणे पाकिस्तानच्या विरोधात गेले होते. कारण तिथल्या जनतेवर अत्याचार झाले होतेे. ही बाब त्यावेळी दडपून टाकण्यात आली व त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. त्यावेळी ईस्ट पाकिस्तानमध्ये किती अत्याचार झाले असतील, हे सध्या पाकिस्तानी लष्कर करीत असलेल्या कारवायांमध्ये समोर येत आहे, असा गंभीर आरोप इम्रान खान यांनी केला.

पाकिस्तानात लोकशाही व्यवस्था रसातळाला गेलेली आहे. यालाही लष्कर जबाबदार असल्याचा ठपका इम्रान खान यांनी ठेवला. मात्र लष्करावर टीका करणारे आम्ही देशविरोधी ठरत नाहीत. उलट पाकिस्तानचे लष्करप्रमुख भ्रष्ट नेत्यांना साथ देऊन आपल्याला लक्ष्य करीत आहेत. ही बाब खपवून घेता येणार नाही. याविरोधात देशव्यापी ‘स्वातंत्र्यलढा’ पुकारला जाईल, असे इम्रान खान यांनी जाहीर केले.

इम्रान खान यांच्या सुटकेसाठी देशभरात हिंसक कारवाया करणाऱ्या त्यांच्या समर्थकांच्या अटकेचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे आपल्या सहकारी व समर्थकांना वाचविण्यासाठी इम्रान खान यांना नवे आंदोलन छेडावे लागत असल्याचे दिसते. इम्रान खान या आंदोलनाची तयारी करीत असताना, पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाचे सदस्य एहसान इक्बाल यांनी इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाला पाकिस्तानचा सुदान बनवायचा आहे, असा आरोप केला. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी यापुढे देशाच्या महत्त्वाच्या ठिकाणांवरील हल्ले खपवून घेणार नाही, असे इशारे दिले होते. तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान व त्यांचे सहकारी दहशतवाद्यांपेक्षा कमी नसल्याचा शेरा मारला होता.

हिंदी

 

leave a reply