लाँग मार्चदरम्यान झालेल्या हल्ल्यातून इम्रान खान बचावले

इस्लामाबाद – आपल्या मागण्या घेऊन राजधानी इस्लामाबादमध्ये लाँग मार्चद्वारे धडक मारण्याच्या तयारीत असलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरूवारी गोळीबार झाला. या हल्ल्यातून इम्रान खान बचावले असले तरी त्यांच्या पायाला गोळी लागल्याचे सांगितले जाते. मात्र इम्रान खान यांना जीवाचा धोका नाही, असा खुलासा पाकिस्तानच्या माध्यमांनी दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान तसेच इतर नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. तर इम्रान खान यांचे समर्थक या हल्ल्याचा सूड घेण्याची धमकी देत आहेत. याचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटले असून काही शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. यामुळे पाकिस्तानात अराजक माजण्याची दाट शक्यता वर्तविली जाते.

Imran Khan survives attackइम्रान खान यांचा लाँग मार्च पंजाबच्या वझिराबाद शहरातील अल्लाहवाला चौकाच्या जवळ असताना, त्यांच्या कंटेनरवर नावेद या तरुणाने गोळ्या झाडल्या. इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली असून यात ते जखमी झाल्याचे व्हिडिओज्‌‍ प्रसिद्ध झाले आहेत. इम्रान खान यांच्या समर्थकांनी नावेदला तिथल्या तिथेच रोखले आणि त्यामुळे अनर्थ टळला. इम्रान खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर उपचार सुरू झाले. ते सुरक्षित असून लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती पाकिस्तानची माध्यमे देत आहेत. या हल्ल्यात एकाचा बळी गेला असून माजी संसद सदस्य व इम्रान खान यांचे सहकारी फैसल जावेद जखमी झाले आहेत.

इम्रान खान यांच्यावरील हा हल्ला त्यांना घाबरवण्यासाठी किंवा इशारा देण्यासाठी नव्हता. तर त्यांना संपविण्याचा कट या हल्ल्यामागे असल्याचे आरोप ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते करीत आहेत. इतकेच नाही तर यातील काही नेत्यांनी या हल्ल्याचा सूड घेण्याची भाषा सुरू केली. तसेच यामागे पाकिस्तानच्या सरकारचा हात असल्याचा आरोपही काहीजणांनी केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करून या दुखापतीतून ते बाहेर पडावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तर पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी या हल्ल्याबाबत आपल्या सरकारवर आरोप करणाऱ्या पीटीआयच्या नेत्यांनी जबाबदारीने बोलावे, असा सल्ला दिला आहे. पण इम्रान खान यांच्यावरील हल्ला हे रेड लाईनचे उल्लंघन ठरते, असे सांगून त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकविण्याची तयारी करीत आहेत. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या जनतेसाठी आपल्या शरीरावर गोळ्या झेलल्या, तरीही पाकिस्तानची जनता रस्त्यावर उतरून याला उत्तर देणार नसेल, तर मग जनता कायम गुलामच राहिल, अशी चिथावणी खान यांचे समर्थक देत आहेत. तसेच खान यांना संपवण्यासाठी सरकार व पाकिस्तानच्या लष्कराने कारस्थान आखल्याचे आरोप होत असताना, इम्रान खान यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या नावेद याने मात्र वेगळीच माहिती दिली.

माझ्या मागे दुसरे कुणीही नाही. इम्रान खान जनतेची दिशाभूल करीत असल्याने मी त्यांच्यावर हल्ला चढविला, असे नावेद याने म्हटले आहे. तरीही इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते ही बाब स्वीकारायला तयार नाहीत. तर इम्रान खान यांनी स्वतःहूनच हा ‘खूनी मार्च’ असेल असा दावा केला होता, याची पाकिस्तानातील पत्रकार आठवण करून देत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाळात रूतलेली असताना, इम्रान खान यांनी हा लाँग मार्च टाळायला हवा होता. कारण भारत, इस्रायल व अमेरिका हे पाकिस्तानचे शत्रू अशाच संधीची वाट पाहत होते, असे सांगून या हल्ल्यामागे परकीय हात असण्याची शक्यता काही पाकिस्तानी पत्रकारांनी वर्तविली आहे. तर इम्रान खान यांच्यावरील या हल्ल्यानंतरच्या पाकिस्तानातील घडामोडींवर भारत नजर ठेवून असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

leave a reply