रशियाचे युक्रेनवर घणाघाती क्षेपणास्त्र हल्ले

३६ तासांमध्ये शंभर क्षेपणास्त्रे डागली

मॉस्को/किव्ह – रशियाकडून युक्रेनविरोधातील हल्ल्यांची तीव्रता पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. गेल्या ३६ तासांमध्ये रशियाने युक्रेनवर घणाघाती क्षेपणास्त्र हल्ले केले असून तब्बल शंभर क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यांमध्ये राजधानी किव्हसह जवळपास १० शहरांना लक्ष्य करण्यात आले. या क्षेपणास्त्रहल्ल्यांबरोबरच खेर्सनमधील युक्रेनी लष्कराचा मोठा हल्ला परतविल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली.

russia ukraineरशिया-युक्रेन संघर्षाला आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला असून त्यानंतरही रशियन हल्ल्यांची तीव्रता कमी झाल्याचे दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी रशियन लष्कराला काही भागांमधून माघार घेणे भाग पडले होते. या माघारीनंतर आता युक्रेन थेट क्रिमिआ ताब्यात घेऊनच थांबेल, अशा वल्गना केल्या जात होत्या. मात्र युक्रेनने क्रिमिआत घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर रशियाने दिलेले प्रत्युत्तर युक्रेनला जेरीस आणत असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रशियाने क्षेपणास्त्र व ड्रोन्सच्या सहाय्याने प्रखर हल्ले करण्यास सुरुवात केली होती.

जवळपास एक महिन्यानंतरही हे हल्ले सुरू असून ही बाब रशियाचे लष्करी सामर्थ्य दाखवून देणारी ठरली आहे. दुसऱ्या बाजूला रशियन लष्कराला मागे लोटत असल्याचे दावे करणाऱ्या युक्रेनी फौजांनाही जोरदार धक्के बसू लागले आहेत. दक्षिण युक्रेनच्या खेर्सनमध्ये रशियन तुकड्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात असून रशियाने नव्या मोहिमेची तयारी केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याचवेळी रशियन लष्कर डोन्बासमधील महत्त्वाचे शहर असलेल्या बाखमतच्या सीमेवर पोहोचले असून पुढील आठवड्यात हे शहर रशियाच्या ताब्यात जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

युक्रेनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रशिया नजिकच्या काळात दोन स्वतंत्र ‘स्ट्राईक ग्रुप्स’च्या माध्यमातून युक्रेनी फौजांना घेरण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे. उत्तरेकडील ग्रुप सुमी शहरातून तर दक्षिणेतील झॅपोरिझिआ शहरातून आक्र्रमण करेल, असे युक्रेनी अधिकाऱ्याने म्हटले आहे. युक्रेनबरोबर चर्चा करण्यापूर्वी त्याला दडपण्याखाली आणण्याच्या योजनेचा हा भाग असल्याचे लेफ्टनंट जनरल झॅब्रोडस्कि यांनी सांगितले.

leave a reply