बीजिंग – गेल्या आठवड्यात झालेल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या अधिवेशनातील घडामोडी शी जिनपिंग हे संस्थापक माओ यांच्यापेक्षा सामर्थ्यशाली झाल्याचे दाखवून देतात, असा दावा विश्लेषकांनी केला आहे. आपल्याला हव्या त्या व्यक्तींची पॉलिटब्युरोत नेमणूक करून जिनपिंग हे पक्षप्रमुख म्हणून नाही तर सम्राट व हुकुमशहा म्हणून चिनी जनतेसमोर आले आहेत, असे मंगोलिअन विश्लेषक शी हायमिंग यांनी बजावले. तर जिनपिंग यांच्या निर्णयांमुळे कम्युनिस्ट पार्टीतील ‘सामूहिक नेतृत्त्वा’ची संकल्पना मृत झाल्याचा दावा वेन झिगँग यांनी केला. कम्युनिस्ट पार्टीतील माजी नेत्यांचे पर्व संपले असून शी जिनपिंग यांना अडथळा ठरु शकेल अथवा त्यांच्यावर नियंत्रण राखेल असे कोणीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे जिनपिंग हे माओ यांच्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली झाल्याकडे वु गुओगुआंग यांनी लक्ष वेधले.
गेल्या आठवड्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे 20वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात जिनपिंग यांनी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीतील मध्यवर्ती निर्णयकेंद्र असणाऱ्या दोन समित्यांवर आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांची निवड करण्यात यश मिळविले होते. पार्टीच्या पॉलिटब्युरोतील सर्वाधिक शक्तीशाली केंद्र असणाऱ्या ‘स्टँडिंग कमिटी’मधील सहा सदस्यांची निवड जिनपिंग यांच्याशी असलेली एकनिष्ठता या निकषावर झाल्याकडे माध्यमे व विश्लेषकांनी लक्ष वेधले होते. याव्यतिरिक्त सेंट्रल कमिटीमधील सर्व सदस्यदेखील जिनपिंग यांच्याच मर्जीतील आहेत. जिनपिंग यांना आव्हान देऊ शकणाऱ्या पंतप्रधान ली केकिआंग व उपपंतप्रधान असणाऱ्या हु चुनहुआ यांची पॉलिटब्युरोतून हकाल्पट्टी करण्यात आली.
जिनपिंग यांचे हे निर्णय त्यांना कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक माओ यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली बनविणारे ठरले आहेत. कम्युनिस्ट पार्टीत यापुढे निवडण्यात येणाऱ्या नेतृत्त्वावर जिनपिंग यांचे पूर्णपणे नियंत्रण असणार आहेत. हे करताना त्यांच्यावर कोणत्याही माजी नेत्यांचा वचक अथवा दडपण नसेल, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. ‘डेंग शाओपिंग, जिआंग झेमिन व हु जिंताओ यासारख्या माजी नेत्यांचे पर्व आता संपले आहे. शी जिनपिंग हेच एकमेव व सर्वोच्च असतील’, असा दावा झाँग ताओ या विश्लेषकांनी केला.
‘जिनपिंग आता मनमानी पद्धतीने कारभार करु शकतात. त्यांचे एकतर्फी निर्णय टोकाचा एकतंत्रीपणा दाखवून देतात. शी जिनपिंग हे आता उघडपणे सम्राट शी जिनपिंग व हुकुमशहा म्हणून समोर आले आहेत’, असा टोला जर्मनीतील विश्लेषक शी हायमिंग यांनी लगावला. आता चीनमधील अनेक नेते जिनपिंग यांची हुजरेगिरी करण्यासाठी रांगेत उभे राहतील व सम्राट गादीवर स्थानापन्न होण्यासाठी वाट बघतील, असेही हायमिंग पुढे म्हणाले. जिनपिंग यांच्या नेतृत्त्वात आर्थिक सुधारणांची मोहीम संपेल व शासनकेंद्रित अर्थव्यवस्थेचा काळ सुरू होईल तसेच चीनमधून मध्यमवर्ग नामशेष होईल, अशी भीतीही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. जिनपिंग यांचा काळ लाल राजवट (रेड रेजिम) म्हणून ओळखला जाईल, असा दावा झाँग ताओ यांनी केला.