मुंबई – ‘आयएनएस विशाखापट्टनम’ नौदलात सहभागी झाली आहे. गायडेड क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली भारतीय बनावटीची सर्वात मोठी स्टेल्थ विनाशिका असलेल्या विशाखापट्टनमच्या सहभागाने भारतीय नौदलाची मारकक्षमता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही विनाशिका ब्राह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रांसह मध्यम व लघू पल्ल्याच्या तोफा तसेच पाणबुड्यांचा भेद घेणारे रॉकेटस्ने सज्ज आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रानेही ही युद्धनौका सुसज्ज आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व नौदलप्रमुख करमबिर सिंग यांच्या उपस्थितीत ‘आयएनएस विशाखापट्टनम’ नौदलाह सहभागी करण्यात आली. ही विनाशिका ताफ्यात आल्याने भारतीय नौदलाची मारकक्षमता प्रचंड प्रमाणात वाढेल. त्याचवेळी नौदलाची टेहळणीची क्षमताही या विनाशिकेमुळे विस्तारणार असल्याचे सांगितले जाते. ७,४०० टन वजनाची व १६३ मीटर इतक्या लांबीची ही विनाशिका ताशी ३० नॉट्स इतक्या वेगाने प्रवास करू शकते. या विनाशिकेवर दोन हेलिकॉप्टर्स तैनात करता येऊ शकतात.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात आत्तापर्यंत दहा विनाशिका व १३ फ्रिगेट्स आहेत. यातील विशाखापट्टनम ही सर्वात सामर्थ्यशाली विनाशिका असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांचेही म्हणणे आहे. ही विनाशिका म्हणजे चीनच्या ‘लुयांग थ्री क्लास’ विनाशिकेला भारतीय नौदलाचे उत्तर असल्याचाही दावा केला. भारताने या श्रेणीतील चार विनाशिकांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता व ‘आयएनएस विशाखापट्टनम’ ही त्यातील पहिली विनाशिका आहे.
मध्यम व लघू पल्ल्यांच्या तोफांनी ही विनाशिका सज्ज आहे. त्याचबरोबर या विनाशिकेवर १६ ब्राह्मोस व आठ बराक ही अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. यामुळे ‘आयएनएस विशाखापट्टनम’चे सामर्थ्य इतर विनाशिकांपेक्षा अधिक असल्याचे नौदल अधिकार्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, २८ नव्हेंबर रोजी ‘आयएनएस वेला’ ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. २० नॉटस् इतक्या वेगाने प्रवास करू शकणारी ही पाणबुडी ५० दिवस पाण्याखाली राहू शकते. देशी बनावटीची ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातो.
चीन व पाकिस्तानपासून असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. यामुळे विनाशिका व पाणबुड्यांच्या निर्मिती आणि त्यांच्या नौदलातील सहभागाचा वेग वाढला आहे. यामुळे भारताचा प्रवास, ब्राऊन वॉटर नेव्ही अर्थात आपल्या सागरी क्षेत्रापुरते मर्यादित असलेल्या नौदलाकडून; ब्ल्यू वॉटर नेव्हीकडे, म्हणजे खोल समुद्रात मोहीम फत्ते करू शकणार्या नौदलाकडे सुरू झाला आहे.