पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये चीनच्या ‘सीपीईसी’विरोधात तीव्र निदर्शने

कराची – चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’चा भाग असणार्‍या ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’(सीपीईसी) विरोधात ग्वादरमध्ये जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत. ‘गिव राईट्स टू ग्वादर’ या नावाने ही निदर्शने सुरू असून सुरक्षाचौक्या हटविण्याची तसेच पाणी व वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे. रविवारी ‘जमात ए इस्लामी बलुचिस्तान’च्या नेतृत्त्वाखाली ग्वादरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आल्याचेही समोर आले.

पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये चीनच्या ‘सीपीईसी’विरोधात तीव्र निदर्शनेबलोचिस्तानमधील प्रमुख बंदर असलेल्या ग्वादरमध्ये पाकिस्तान सरकार व लष्कराने लादलेल्या निर्बंधांवरून तसेच अपुर्‍या सुविधांवरून आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू असून त्याअंतर्गत सभा, धरणे तसेच मोर्चे आयोजित करण्यात येत आहेत. सुरक्षा चौक्या हटविणे, मकरानच्या किनार्‍यावरील मोठे ट्रॉलर्स हटविणे, वीज तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे यासारख्या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

आंदोलनात राजकीय पक्ष, नागरी गट, मच्छिमार यांच्यासह सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहिल, असा इशारा स्थानिक नेते मौलाना हिदायत उर रेहमान यांनी दिला. सरकारने ग्वादरच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने निदर्शने करावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्वादरमध्ये मोठा प्रकल्प उभारण्यात येत असला तरी शहरातील स्थानिक बेरोजगारच राहिले असून सरकारने त्याकडे लक्ष दिले नसल्याची टीकाही रेहमान यांनी केली.

ग्वादरमध्ये सुरू झालेले आंदोलन सीपीईसीविरोधात पाकिस्तानमधील वाढत्या असंतोषाचे प्रतीक मानले जाते. ग्वादरचा प्रकल्प हा चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्हमधील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. पण या प्रकल्पामुळे पाकिस्तानात आलेल्या चिनी कंपन्या व कर्मचारी तसेच स्थानिक प्रशासनाने तैनात केलेली सुरक्षायंत्रणा याविरोधात तीव्र नाराजीची भावना आहे. त्याचे पडसाद अधिक तीव्रतेने उमटण्यास सुरुवात झाली असून नवे आंदोलन त्याचाच भाग दिसत आहे.

leave a reply