चिनी मोबाईल्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी

-गैरव्यवहारासाठी हजार कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो

नवी दिल्ली  – गैरव्यवहारात गुंतलेल्या चिनी मोबाईल्सची निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. 21 डिसेंबर रोजी टाकलेल्या या धाडींची महिती उघड झाली असून यात सुमारे 5,500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यासाठी सदर कंपन्यांना सुमारे एक हजार कोटी रुपये इतका दंड भरावा लागू शकतो. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

धाडीकर्नाटक, तमिळनाडू, आसाम, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान आणि दिल्ली या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाला अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली. आपल्या व्यवहार व खात्यांबाबत या कंपन्यांनी दिलेली माहिती त्यांच्या आर्थिक व्यवहाराशी मेळ असलेली नव्हती. यात बरेच गैरव्यवहार असल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानुसार त्यांनी तपास करून सदर गैरव्यवहाराचे पुरावे मिळविले आहेत, असे ‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस-सीबीडीटी`ने म्हटले आहे.

या कंपन्यांना दुसऱ्या देशातून अवैधरित्या पैसे व इतर सहाय्य पुरविले जात होते. याची एकूण रक्कम सुमारे 5,500 कोटी रुपयांवर जाते, अशी माहिती सीबीडीटीने दिली. या कंपन्यांची मोडस ऑपरेंडी उघड झाली असून यात फार मोठा गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले. यावर कारवाई केली जाणार असून यासाठी सदर कंपन्यांना दंड भरावा लागेल. या दंडाची रक्कम तब्बल हजार कोटी रुपये इतकी असू शकते, असे सीडीबीटीने म्हटले आहे.

या कंपन्या चिनी मोबाईल्सची निर्मिती करतात. त्यामुळे सदर गैरव्यवहारामागे चीनचा हात असण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. याआधीही भारतात अशा स्वरुपाचे चिनी कंपन्यांचे रॅकेट चालत असल्याचे उघड झाले होते. तसेच चिनी कंपन्या निधीच्या अवैध हस्तांतरणात गुंतलेल्या असल्याची बाबही समोर आली होती. केवळ भारतच नाही तर इतर देशांमध्येही चीन अशारितीने त्या देशांचे कायदे धाब्यावर बसवून गैरव्यवहार करीत असल्याची कितीतरी प्रकरणे जगजाहीर झाली होती. काही देशांनी तर या गैरव्यवहाराच्या मागे असलेल्या चिनी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते.

5जी क्षेत्रात कार्यरत असलेल्या चिनी कंपनी हुवेईच्या वरिष्ठ अधिकारी मेंग वँगझो यांना कॅनडाने अटक करून त्यांना बराच काळ ताब्यात ठेवले होते.

leave a reply