अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

- केंद्रीय गृहमंत्रालय

नवी दिल्ली – भारतात अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात जोरदार कारवाई हाती घेण्यात आल्याने अमली पदार्थांसंदर्भात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी लोकसभेत दिली. अमली पदार्थांचा व्यापार व तस्करीचे गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्याच्या यंत्रणा समन्वयाने काम करीत असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यावेळी अधोरेखित केले.

अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ - केंद्रीय गृहमंत्रालयअमली पदार्थांच्या तस्करीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. अमली पदार्थांविरोधात जागरुकताही वाढल्याने नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे नागरिस्रोताकडून कित्येक सूचना यंत्रणांना मिळत आहेत. याशिवाय गुप्तचर यंत्रणांकडून मिळणारी माहितीच्या आधारावर विविध यंत्रणा अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई करीत आहेत. यामुळे यासंर्भात नोंदविण्यात येत असलेल्या गुन्ह्यांची संख्याही वाढली आहे, असे राय यांनी म्हटले आहे.

2018 साली अमली पदार्थ तस्करीसंदर्भात देशभरात 49 हजार 450 गुन्हे नोंदविण्यात आले होते. हे गुन्हे 2019 साली 17 टक्क्यांनी वाढून 57 हजार 867 वर गेले आहेत. तसेच अमली पदार्थांचा व्यापार व तस्करीसंदर्भात 74620 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काही परदेशी नागरीक आहेत, अशी माहिती राय यांनी लोकसभेत दिली. 2016 साली अमली पदार्थांविरोधात कारवाई करताना केंद्रीय व राज्यांच्या यंत्रणांमध्ये समन्वय रहावा यासाठी नार्को कॉर्डिनेशन सेंटरची (एनसीओआरडी) स्थापना करण्यात आली होती. तसेच 2019 मध्ये या यंत्रणेमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली, याकडेही राय यांनी लक्ष वेधले.

भारतात अफगाणिस्तानातून हेरॉईनची मोठ्या प्रमाणावर विविध मार्गांने तस्करी होत आहे. यासंदर्भात दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडच्या काळात मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाले होते व हजारो कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा पकडण्यात आला होता. दिल्लीत काही दिवसांपूर्वी दोन हजार कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते, मुंबई बंदरात 800 कोटी रुपयांचे हेरॉईन सापडले होते. मुंबई समुद्री क्षेत्रात गेल्या आठ ते दहा महिन्यात सुमारे सात हजार कोटीहून अधिकचे अमली पदार्थ विविध कारवायांमध्ये पकडण्यात आले आहेत. डायरोक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्सच्या (डीआरआय) तपासात या अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात बरीच माहिती मिळाली आहे. आफ्रीकन अमली पदार्थ तस्करी टोळ्या, तालिबानही यामध्ये तस्करीमध्ये सामील असून अलिकडील काळात उघड झालेली प्रकरणे हिमनगाचे केवळ टोक असल्याचा दावा डीआरआयच्या एका अधिकार्‍याने केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, सुंयक्त राष्ट्राचा वर्ल्ड ड्रग्ज रिपोर्ट हा अहवाल 2021 नुसार भारतात प्रस्कीप्शन ड्रग्ज म्हणजे औषधासाठी वापर अमली पदार्थांसारखा करण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रामडोल सारखे वेदनाशामक औषध भारतात जगात सर्वाधिक प्रमाणात अमली पदार्थ म्हणून वापरले जात असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच 2019 सालात जगात सर्वाधिक प्रमाणत अफू जप्त करण्यात आलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश होता, याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

leave a reply