भारत ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज म्हणून काम करीत आहे

- व्यापारमंत्री पियूष गोयल

रोम – विकसनशील व अविकसित देशांचा प्रतिनिधी म्हणून भारत काम करीत आहे. भारत केवळ आपल्या १.४ अब्ज जनतेसाठीच नाही, तर इतर देशांमधील जनतेच्या कल्याणासाठी, विशेषतः ग्लोबल साऊथच्या विकासासाठी योगदान देत आहे, असा दावा केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी केला. इटलीच्या दौऱ्यावर असेले व्यापारमंत्री गोयल रोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

भारत ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज म्हणून काम करीत आहे - व्यापारमंत्री पियूष गोयलकुणीही अन्नवस्त्रावाचून राहू नये, आरोग्य आणि शिक्षणाची सुविधा प्रत्येकालाच उपलब्ध व्हावी, यासाठी भारत काम करीत आहे, ही बाब यावेळी व्यापारमंत्री गोयल यांनी लक्षात आणून दिली. भारतातील १.४ अब्ज जनता आपले जीवनमान अधिक उंचावण्यासाठी उत्सुक आहे. या जनतेला भारत आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगून व्यापारमंत्र्यांनी त्याचे दाखले देखील यावेळी दिले.

भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या ८० कोटींवर गेली आहे. तसेच भारतात सर्वत्र ४जी तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे आणि आता ५जी तंत्रज्ञानाचा वापरही भारतात सुरू झाला आहे. २०२३ सालच्या अखेरपर्यंत देशाच्या मुख्य शहरांमध्ये ५जी सेवा सुरू झालेली असेल, अशी माहिती यावेळी पियूष गोयल यांनी दिली. याबरोबर भारत आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आता रुपयाचा वापर करू लागला आहे. यामुळे आर्थिक व्यवहारासाठी उद्योगांना येणारा खर्च कमी झाला आहे. म्हणूनच भारताच्या रिझर्व्ह बँकेशी रुपयामध्ये व्यवहार करण्यावर विविध देश चर्चा करीत आहेत, अशी माहिती पियूष गोयल यांनी दिली.

भारतातील बँकांनी आपल्या देशातील बँकांमध्ये वोस्त्रो खाती उघडावी, यासाठी देशांचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या डॉलरमध्ये व्यवहार करण्यापेक्षा रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी हे देश अधिक उत्सुकता दाखवित आहेत, असे सांगून व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी अर्थकारणाचा कल बदलत असल्याची जाणीव करून दिली.

दरम्यान, व्यापारमंत्री पियूष गोयल यांची या दौऱ्यात इटलीचे उपपंतप्रधान अँटोनियो तजानी यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत भारताच्या युरोपिय महासंघाबरोबरील मुक्त व्यापारी करारावरील वाटाघाटींचा मुद्दा होता, अशी माहिती दिली जाते. भारत व युरोपिय महासंघामध्ये संतुलित, खुला व न्याय्य मुक्त व्यापारी करार संपन्न होईल, असा विश्वास यावेळी दोन्ही नेत्यांच्या संयुक्त निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस भारत व इटलीमध्ये आर्थिक सहकार्यावर पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली.

leave a reply