रशिया व चीनला रोखण्यासाठी ‘न्यू अमेरिकन ग्रँड स्ट्रॅटेजी’

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचा प्रस्ताव

वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयाला आलेल्या ‘रशिया-चीन ॲक्सिस’चा वाढता धोका रोखण्यासाठी अमेरिका व सहकारी देशांनी नव्या धोरणाचा स्वीकार करायला हवा, असा प्रस्ताव अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिला आहे. अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकात लिहिलेल्या लेखात बोल्टन यांनी, शीतयुद्धानंतरचे एक पर्व संपल्याचे सांगून नवे धोके समोर आल्याची जाणीव करून दिली. आपल्या लेखात मांडलेल्या प्रस्तावात त्यांनी तीन मुद्दे अधोरेखित केले असून त्यात संरक्षणखर्चात वाढ करणे, ‘कलेक्टिव्ह डिफेन्स अलायन्स’चा विस्तार व ग्लोबल नाटो आणि रशिया-चीन ॲक्सिस तोडणे यांचा समावेश आहे.

Russia and Chinaअमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये बोल्टन यांनी ‘न्यू अमेरिकन ग्रँड स्ट्रॅटेजी’ या नावाने लेख लिहिला आहे. त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या बैठकीचा उल्लेख आहे. रशिया-चीन ॲक्सिस व त्यांना उत्तर कोरिया तसेच इराणसारख्या देशांची असलेली साथ हा नवा धोका असल्याचा उल्लेख बोल्टन यांनी केला. या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी तीन मुद्दे अधोरेखित केले.

New American Grand Strategyअमेरिका व सहकारी देशांनी त्यांच्या संरक्षणखर्चात ‘रिगन कालखंडा’प्रमाणे मोठी वाढ करण्याची गरज आहे, असे बोल्टन यांनी सुचविले. ही वाढ तात्पुरत्या काळासाठी नाही तर दीर्घकालिन हवी, असे अमेरिकेच्या माजी सल्लागारांनी म्हटले आहे. अमेरिकेने एकत्रित सुरक्षा हे उद्दिष्ट ठेऊन तयार केलेल्या आघाड्यांमध्ये अधिक सुधारणा व विस्तार गरजेचा असल्याचे बोल्टन यांनी दुसऱ्या मुद्यात म्हटले आहे. स्पेनचे माजी पंतप्रधान जोस मारिअ अझ्नार यांनी दिलेला ‘ग्लोबल नाटो’चा प्रस्ताव पुढे न्यायला हवा, असे यात सुचविण्यात आले आहे. त्यात जपान, ऑस्ट्रेलिया, इस्रायल यासारख्या देशांचा समावेश करण्याचा सल्ला बोल्टन यांनी दिला.

त्याचवेळी अमेरिकेने आखाती देशांशी असलेले सहकार्य अधिक वाढवून या क्षेत्रातील रशिया व चीनचा प्रभाव संपवायला हवा, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. आपल्या लेखात बोल्टन यांनी क्वाड, ऑकससह ‘एशियन नाटो’चाही उल्लेख केला. तिसरा मुद्दा मांडताना युक्रेन रशियाविरोधातील युद्ध जिंकेल, असा दावा अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांनी केला. त्यानंतर अमेरिकेने रशिया व चीनची आघाडी तोडण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे, असे बोल्टन यांनी सुचविले आहे.

leave a reply