एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे चीन-पाकिस्तानवरील दडपण वाढले

नवी दिल्ली – गुरुवारपासून गोव्यामध्ये शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक सुरू होत आहे. चीन व पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इथली उपस्थिती हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरणार असल्याचे दिसते. विशेषतः भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या लॅटिन अमेरिकन देशांच्या दौऱ्यात चीन व पाकिस्तानवर केलेल्या टीकेनंतर, हे दोन्ही देश सदर बैठकीत कोणती प्रतिक्रिया देतात, याकडे भारतासह इतर प्रमुख देशांचेही लक्ष लागलेले आहे.

एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे चीन-पाकिस्तानवरील दडपण वाढलेचीनपासून संभवणाऱ्या धोक्यामुळे भारत व अमेरिका एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे दावे केले जातात. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेला भारताचे सहाय्य अपेक्षित आहे. त्याचवेळी एलएसीवरील चीनच्या कारवायांमुळे भारताचे या देशाबरोबरील संबध ताणलेले असल्याचे सांगून भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जगाला वास्तवाची जाणीव करून दिली. दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये आलेला हा तणाव चीनमुळे निर्माण झाल्याचेही जयशंकर यांनी स्पष्टपणे बजावले होते. लॅटिन अमेरिकन देशांमध्ये बोलताना जयशंकर यांनी चीनवर हा ठपका ठेवला होता.

तसेच पाकिस्तानने अजूनही दहशतवाद सोडून दिलेला नाही व त्यामुळे भारत पाकिस्तानशी चर्चा करायला तयार नाही, असेही जयशंकर यांनी या दौऱ्यात म्हटले होते. या दोन देशांचा अपवाद वगळता भारताचे अमेरिका, युरोपिय देश, रशिया व जपानशी उत्तम संबंध असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जाहीर केले. एससीओच्या बैठकीआधी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली ही विधाने लक्षवेधी ठरतात. यामुळे चीनची अस्वस्थता अधिकच वाढू शकते. याआधी नवी दिल्लीत पार पडलेल्या एससीओच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनविरोधात कठोर भूमिका स्वीकारल्याची तक्रार या देशाकडून करण्यात आली होती.

पाकिस्तानातील माध्यमे व विश्लेषक परराष्ट्रमंत्री जयशंकर पाकिस्तानला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे सांगून यावर चिंता व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे नवशिके परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो एससीओच्या बैठकीसाठी जात आहेत. त्यांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा सामना करता येईल का, असा प्रश्न पाकिस्तानी माध्यमे व विश्लेषकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होत असलेल्या या बैठकीकडे चीन व पाकिस्तान अतिशय बारकाईने पाहत आहेत.

हिंदी

 

leave a reply