भारत व बांगलादेशमध्ये सात सहकार्य करार

नवी दिल्ली – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या भारतभेटीत दोन्ही देशांमध्ये सात सहकार्य करार संपन्न झाले आहेत. भारत व बांगलादेशची मैत्री कुठल्याही समस्येवर मात करू शकते, असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच विकास आणि व्यापाराच्या आघाडीवर बांगलादेश हा भारताचा या क्षेत्रातील सर्वात मोठा भागीदार असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांमध्ये विवादाचा मुद्दा असलेला तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा मुद्दाही लवकरच मार्गी लागेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

PM Modi and Sheikh Hasina meetबांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने दिलेल्या योगदानाची कृतज्ञतापूर्ण जाणीव ठेवून पंतप्रधान शेख हसिना यांनी यासाठी भारताचे आभार मानले आहेत. भारत हा बांगलादेशचा सर्वात महत्त्वाचा शेजारी देश आहे, असे शेख हसिना पुढे म्हणाल्या. 1971 सालच्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांच्या पुढच्या पिढ्यांच्या शिक्षणासाठी शेख मुजिबूर शिष्यवृत्ती जाहीर करून पंतप्रधान शेख हसिना यांनी यासाठी भारत सरकारने केलेल्या सहाय्याचीही प्रशंसा केली. दोन्ही देशांमधील मैत्री व सहकार्य पुढच्या काळात नवी उंची गाठेल, असा विश्वासही यावेळी शेख हसिना यांनी व्यक्त केला आहे.

दोन्ही देशांमध्ये वाहणाऱ्या कुशियारा नदीच्या पाणीवाटपावर भारत व बांगलादेशमध्ये एकमत झाले असून यावर सहकार्य करार संपन्न झाला. याचा फायदा भारताच्या आसाम राज्यातील दक्षिणेकडी जनतेला व बांगलादेशातील सिल्हेट भागाला होईल, असे सांगितले जाते. दोन्ही देशांमध्ये 54 नद्या वाहत असून त्यांच्या पाणीवाटपाचा प्रश्न लवकरच सुटेल असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी यामध्ये तिस्ता नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्याचाही समावेश केला. बांगलादेश या नदीच्या पाणीवाटपाबाबत आग्रही असून यावर दोन्ही देशांमधील संबंध काही काळासाठी ताणले गेले होते. पण उभय देशांमधील मैत्री सर्वच समस्यांवर मात करील, असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

याबरोबरच दोन्ही देशांच्या मैत्री औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पहिल्या युनिटचे यावेळी अनावरण करण्यात आले. भारताच्या सहाय्याने उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पामुळे बांगलादेशला माफक दरात वीज उपलब्ध होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याबरोबरच रुपशा नदीवरील रेल्वे पुलाचे उद्घाटनही यावेळी झाले. यामुळे दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, असा दावा करण्यात येत आहे. भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरील दळणवळण व पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास उभयपक्षी व्यापाराला चालना मिळेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

आत्ताच्या काळात बांगलादेश आशियामध्ये सर्वाधिक निर्यात भारतालाच करीत आहे, असे सांगून या पायाभूत सुविधांच्या विकासाचा फार मोठा लाभ बांगलादेशला मिळेल, याची जाणीव पंतप्रधान मोदीयांनी करून दिली. पूर्वेकडील देशांशी व्यापार वाढविण्यासाठी भारताला बांगलादेशच्या भूमीचा वापर करावा लागणार असून यासाठी भारत मोठ्या प्रमाणात या देशात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी उत्सूक आहे. त्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी या सहकार्यापासून बांगलादेशला होणाऱ्या लाभाची मांडणी यावेळी नेमक्या शब्दात केली.

याबरोबरच बांगलादेशची रेल्वे सेवा सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेशी करार संपन्न झाला आहे. यानुसार बांगलादेशच्या रेल्वेविभागातील अधिकाऱ्यांना भारतीय रेल्वेकडून प्रशिक्षण दिले जाईल. याबरोबरच विज्ञान व तंत्रज्ञान आणि अंतराळासंदर्भातील सहकार्यावरही भारत व बांगलादेशात करार पार पडला.

परस्परांना नद्यांच्या पाणीपातळीबाबत वेळीच माहिती पुरवून पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सहकार्यावर पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी आपली यशस्वी चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. याबरोबरच कट्टरवाद व दहशतवादाच्या विरोधात दोन्ही देशांचे सहकार्य वाढविण्यावरही आपले एकमत झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 1971 सालच्या बांगलादेशच्या स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत ठेवण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे, याची जाणीव पंतप्रधान मोदी यांनी यावेळी करून दिली. याबरोबरच भारत व बांगलादेशच्या एकमेकांवरील विश्वासावर प्रहार करू पाहणाऱ्या शक्तींचा एकजुटीने सामना करणे दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे ठरते, याकडेही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

leave a reply