अफगाणिस्तानबाबत भारत व रशियाला वाटत असलेली चिंता एकसमान

- रशियन राजदूतांचा दावा

चिंता एकसमाननवी दिल्ली – भारत आणि रशियाला अफगाणिस्तानबाबत वाटत असलेली चिंता एकसमान आहे, असा दावा रशियाचे भारतातील उपराजदूत निकोलाय कुडाशेव्ह यांनी केला. अफगाणिस्तानची भूमी दुसर्‍या देशाच्या विरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाऊ नये, अशी दोन्ही देशांची अपेक्षा आहे, असे राजदूत कुडाशेव्ह म्हणाले. भारत व रशियाच्या विरोधात अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जाऊ शकतो, हा धोकाही रशियन राजदूतांनी अधोरेखित केला.

गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानबाबत भारत व रशियाचे हितसंबंध परस्परविरोधी असल्याचे संकेत मिळत होते. रशियाने अफगाणिस्तानातील आपले हितसंबंध जपण्यासाठी पाकिस्तानबरोबर सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान, चीन, इराण व रशिया हे देश मिळून तालिबानच्या अफगाणिस्तानातील राजवटीला सहकार्य करतील असे दावे पाकिस्तानी विश्‍लेषकांनी ठोकले होते. अशा परिस्थितीत रशियन राजदूतांनी अफगाणिस्तानबाबत केलेली ही विधाने महत्त्वाची ठरते.

भारत व रशियाच्या अफगाणिस्तानविषयक भूमिकेत विशेष तफावत नाही, असे सांगून राजदूत कुडाशेव्ह यांनी भारताला आश्‍वस्त केल्याचे दिसते. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार येत असताना, जगभरातील प्रमुख देश याकडे अत्यंत बारकाईने पाहत आहे. अमेरिका तसेच युरोपिय देशांबरोबर भारत तालिबानच्या या सरकारविरोधात आहे, असा दावा पाकिस्तानचे विश्‍लेषक करीत आहेत. तर दुसर्‍या बाजूला चीन, रशिया हे देश तालिबानच्या सरकारमागे उभे राहतील, असे या पाकिस्तानी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मात्र भारतापेक्षा रशियाची भूमिका फार वेगळी नसल्याचे सांगून रशियन राजदूतांनी हा दावा निकालात काढल्याचे दिसते.

तालिबानने अफगाणिस्तानात सर्वसामावेशक सरकार स्थापन केले, तरच रशिया या सरकारच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल, असे रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे रशिया देखील तालिबानच्या हालचालींवर करडी नजर?ठेवून असल्याचे स्पष्ट होते. तालिबानबरोबरच रशियाने पाकिस्तानवर दाखविलेला अविश्‍वासही यातून समोर येत आहे. ही भारतासाठी फार मोठी जमेची बाजू ठरते. दरम्यान, रशियावर सध्या चीनचा प्रभाव वाढत चालला असून अफगाणिस्तानातही रशिया चीनला अनुकूल भूमिका घेईल, असा निष्कर्ष काही भारतीय विश्‍लेषकांनीही नोंदविला होता. पण अफगाणिस्तानवर चीनचा प्रभाव वाढला तर तो मध्य आशियाई देशांमधील रशियाच्या हितसंबंधासाठी धोकादायक ठरेल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply