नवी दिल्ली – भारत व ऑस्ट्रेलियामधील मुक्त व्यापारी करारावरील चर्चा लवकरच तडीस लागेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ऍबट यांनी व्यक्त केला. यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक सहकार्य प्रचंड प्रमाणात विकसित होईल, असे ऍबट म्हणाले. चीनने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात व्यापारयुद्ध पुकारले आहे. अशा काळात ऑस्ट्रेलिया चीनचा अधिक विश्वासार्ह पर्याय असलेला व्यापारी भागीदार देश म्हणून भारताकडे पाहत आहे. व्यापारी करारावरील चर्चेसाठी भारतात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ऍबट यांनी चीन व्यापाराचे लष्करीकरण करीत असल्याचा ठपका ठेवला आहे.
चीनने तैवानवर हल्ला चढविण्याची तयारी केली असून याला विरोध करणार्या देशांच्या विरोधात चीनने आक्रमक पावले उचलली आहेत. इतकेच नाही तर राजकीय व सामरिक हेतूने चीन करीत असलेल्या गुंतवणूक व प्रकल्पांना विरोध करणार्या देशांविरोधात चीनने कडक कारवाई सुरू केली आहे. याचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. ऑस्ट्रेलियाने चीनची गुंतवणूक व प्रकल्प यांचा धोका ओळखून त्याविरोधात काही कठोर निर्णय घेतले होते. विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या हालचाली घातक असल्याचे सांगून ऑस्ट्रेलियाने याविरोधात अमेरिका, जपान व भारताशी सहकार्य सुरू केले. यावर खवळलेल्या चीनने ऑस्ट्रेलियावर आर्थिक निर्बंध लादले होते. चीनने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात आर्थिक युद्धच छेडले आहे, असा आरोप अमेरिकेने काही दिवसांपूर्वी केला होता.
या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारताबरोबरील व्यापारी सहकार्य व्यापक करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. याआधी दोन्ही देशांमध्ये ‘कॉंप्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन ऍग्रीमेंट – सीईसीए’वर चर्चा सुरू होती. या चर्चेसाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे विशेष व्यापारीदूत म्हणून माजी पंतप्रधान टोनी ऍबट भारतात आले आहेत. त्यांची भारताचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा पार पडली. या चर्चेवर ऍबट यांनी समाधान व्यक्त केले असून लवकरच दोन्ही देशांमध्ये हा व्यापारी करार संपन्न होईल, असा विश्वास व्यक्त केला. याआधीही माजी पंतप्रधान ऍबट यांनी भारत हा चीनचा अधिक विश्वासार्ह व्यापारी पर्याय ठरेल, असे बजावले होते.
यावेळीही टोनी ऍबट यांनी चीनच्या व्यापारी धोरणांवर सडकून टीका केली. चीन व्यापाराचे लष्करीकरण करीत असल्याचा ठपका ऍबट यांनी ठेवला. ऑस्ट्रेलियाचा सुमारे २० अब्ज डॉलर्सचा व्यापार यामुळे विस्कळीत झालेला आहे, असे सांगून ऍबट यांनी यापुढे चीनकडे ऑस्ट्रेलिया विश्वासार्ह व्यापारी भागीदार म्हणून पाहू शकणार नाही, असा इशारा दिला. त्याचवेळी ऍबट यांनी चीन आणि भारतामधील तफावत स्पष्ट केली.
भारत हा लोकशाहीवादी देश असून भारतात कायद्याचे राज्य आहे. भारतात सरकारची धोरणे व व्यापार या दोन वेगवेगळ्या गोष्टी मानल्या जातात. तसेच भारत केलेल्या करारांचा आदर राखतो, असे सांगून ऍबट यांनी चीनकडे अशी विश्वासार्हता नसल्याची बाब लक्षात आणून दिली. यामुळे ‘सप्लाय चेन’ अर्थात पुरवठा साखळीसाठी भारत अधिक जबाबदार देश ठरेल, असे सांगून ऍबट यांनी सार्या जगाला भारत चीनला उत्तम पर्याय ठरू शकतो, याची जाणीव करून दिलेली आहे.