फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची सौदी अरेबियाला भेट

- इराण, लेबेनॉन व येमेनच्या मुद्यावर चर्चा करणार

रियाध – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी शनिवारी सौदी अरेबियाला भेट दिली. ही भेट मॅक्रॉन यांच्या आखाती दौर्‍याचा भाग असल्याचे सांगण्यात येते. या दौर्‍यात फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी युएई व कतारलाही भेट दिली आहे. सौदी अरेबियाच्या दौर्‍यात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. गेल्या दोन वर्षात क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणारे मॅक्रॉन हे पहिले मोठे पाश्‍चात्य नेते ठरले आहेत.

शुक्रवारपासून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आखाती देशांच्या दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पहिल्यांदा युएईला भेट दिली. त्यानंतर शनिवारी सकाळी कतारला भेट देऊन ते सौदी अरेबियात दाखल झाले. मॅक्रॉन यांचा हा दौरा क्षेत्रिय स्थैर्यासाठी असल्याचे फ्रेंच सूत्रांकडून सांगण्यात आले. युएईच्या दौर्‍यात फ्रान्स व युएईमध्ये १८ अब्ज डॉलर्सचा रफायल लढाऊ विमानांचा करार पार पडला होता. शनिवारी सकाळी कतारच्या दौर्‍यात अफगाणिस्तान तसेच इराणच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती फ्रान्सकडून देण्यात आली.

सौदी अरेबियाच्या दौर्‍यात इराण व लेबेनॉनसह येमेनच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. गेले वर्षभर सातत्याने अस्थैर्याला तोंड देणार्‍या लेबेनॉनसाठी फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. आखाती देश लेबेनॉनला अर्थसहाय्य पुरविणार्‍या देशांमधील आघाडीचे देश आहेत. मात्र गेल्या काही महिन्यात या देशांबरोबरील लेबेनॉनचे संबंध बिघडले असून त्यावर तोडगा काढण्यासाठी मॅक्रॉन सौदीच्या नेतृत्त्वाशी चर्चा करतील, असे संकेत देण्यात आले आहेत.

इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या असल्या तरी ठोस तोडगा निघालेला नाही. फ्रान्ससह युरोपिय देशांनी अणुकराराच्या बाजूने भूमिका घेतली असून सौदी व युएईसारख्या देशांचा त्याला विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी इराण मुद्यावरही बोलणी करतील, असे सांगण्यात येते. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याबरोबर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे चांगले संबंध असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. फ्रान्स हा सौदी अरेबियाला सर्वाधिक शस्त्रपुरवठा करणार्‍या देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

leave a reply