भारत व ऑस्ट्रेलियामधील मुक्त व्यापारी कराराची अंमलबजावणी सुरू

मुक्त व्यापारी कराराचीनवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मुक्त व्यापारी कराराची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. भारताच्या पंतप्रधानांनी याचे स्वागत केले आहे. दोन्ही देशांमधील व्यापक धोरणात्मक सहकार्यासाठी ही ऐतिहासिक घटना ठरते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांनी या व्यापारी करारामुळे ऑस्ट्रेलियन उद्योगक्षेत्रासमोर फार मोठी संधी आल्याचा दावा केला. पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यात आपण व्यापारी शिष्टमंडळासह भारताला भेट देणार असल्याची घोषणाही यावेळी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी केली आहे. या मुक्त व्यापारी करारामुळे भारत व ऑस्ट्रेलियाचा व्यापार पुढच्या पाच वर्षात 45 ते 50 अब्ज डॉलर्सवर जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.

या वर्षाच्या 2 एप्रिल रोजी भारत व ऑस्ट्रेलियामध्ये ‘इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड ॲग्रीमेंट-इसीटीए’वर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर 88 दिवसात यावर वाटाघाटी झाल्या आणि त्यानंतर गुरुवारपासून या कराराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. भारताचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ‘ब्रेट ली’चा वेग आणि सचिन तेंडुलकरची परिपूर्णता या कराराच्या वाटाघाटींमध्ये होती, असे म्हटले आहे. तसेच या करारामुळे भारताच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना फार मोठा लाभ मिळेल, असा दावा व्यापारमंत्र्यांनी केला आहे. सध्या भारत व ऑस्ट्रेलियामधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार 31 अब्ज डॉलर्सवर आहे. मात्र ‘इसीटीए’मुळे पुढच्या पाच वर्षात दोन्ही देशांमधील व्यापार 45 ते 50 अब्ज डॉलर्सवर जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियाबरोबरील या व्यापारी सहकार्यामुळे भारतात सुमारे 10 लाख नवे रोजगार तयार होतील, अशी माहिती दिली जात आहे. या करारामुळे भारताच्या 100 टक्के इतक्या उत्पादनांना ऑस्ट्रेलियातील बाजारपेठेचा थेट लाभ घेता येईल व करसवलतही मिळेल. 98.3 टक्के इतक्या प्रमाणात ऑस्ट्रेलिया केल्या जाणाऱ्या भारतीय निर्यातीला या व्यापारी कराराच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवसापासून ही सवलत मिळणार आहे. तर उरलेल्या भारताच्या निर्यातीला पाच वर्षात टप्प्याटप्प्याने ही सवलत दिली जाईल. तर ऑस्ट्रेलियातील भारताच्या निर्यातीपैकी 70 निर्यातीला भारताकडून करात सवलत दिली जाणार आहे. यापैकी ऑस्ट्रेलियाच्या सुमारे 40 टक्के इतक्या निर्यातीला भारताकडून या कराराच्या पहिल्याच दिवसापासून सवलत दिली जात आहे.

इसीटीएमुळे भारताला ऑस्ट्रेलियाकडून कोळसा, ॲल्युमिनिअम इत्यादी कच्च्या मालाचा माफक दरात पुरवठा मिळेल. याचा फार मोठा लाभ देशाच्या उत्पादन क्षेत्राला मिळून भारतीय उद्योगक्षेत्र यामुळे जागतिक स्पर्धेत अधिक प्रभावीपणे कामगिरी करील, असे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. तर ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री डॉन फॅरेल यांनी इसीटीए म्हणजे जगातील दोन मोठ्या लोकशाहीवादी देशांमधील व्यापारी सहकार्य ठरते, याकडे लक्ष वेधले आहे. यामुळे ऑस्ट्रेलियासाठी सुमारे दीड अब्ज जनसंख्या असलेली भारताची बाजारपेठ खुली होईल, असा विश्वास व्यापारमंत्री डॉन फॅरेल यांनी व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियाच्या व्यापारमंत्री केलेला हा लोकशाहीवादी देशांचा उल्लेख लक्षवेधी ठरतो. राजकीय मतभेदांमुळे चीन व ऑस्ट्रेलियामधला व्यापार थंडावला असून चीनने ऑस्ट्रेलियाच्या निर्यातीला लक्ष्य करणारी धोरणे स्वीकारली होती. तैवानचा प्रश्न, तसेच कोरोनाच्या साथीबाबत ऑस्ट्रेलियाने स्वीकारलेली भूमिका व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी धोरणांना केलेला विरोध, यामुळे चीन ऑस्ट्रेलियावर संतापलेला आहे. या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाने भारताबरोबरील व्यापारी व लष्करी सहकार्य वाढवून चीनच्या दबावाला प्रत्युत्तर दिले होते. म्हणूनच भारताबरोबरील ऑस्ट्रेलियाचा हा मुक्त व्यापारी करार केवळ आर्थिकच नाही, तर दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. याचे प्रतिबिंब ऑस्ट्रेलियाकडून या करारावर देण्यात येत असलेल्या प्रतिक्रियेवर पडल्याचे दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांनी या कराराचे स्वागत करीत असतानाच, पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यात उच्चस्तरिय व्यापारी शिष्टमंडळासह आपण भारताच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा या निमित्ताने केली. भारताच्या पंतप्रधानांनी आपल्याला या दौऱ्याचे आमंत्रण दिल्याची माहिती पंतप्रधान अल्बानिज यांनी दिली आहे.

याआधी भारताने संयुक्त अरब अमिरातीबरोबरही मुक्त व्यापारी करार केला असून याचा फार मोठा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार असल्याचे दावे केले जातात. तर ब्रिटन व युरोपिय महासंघाबरोबरही भारताची मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू आहे. ही चर्चा देखील लवकरच तडीस लागेल, विशेषतः ब्रिटनबरोबरील व्यापारी करार नजिकच्या काळात संपन्न होईल, असा विश्वास ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी व्यक्त केला होता. तर विश्वासार्ह व्यापारी भागीदार देश म्हणून जगभरातून भारताकडे पाहिले जात आहे व कित्येक देश भारताशी मुक्त व्यापार करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती माहिती व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी नुकतीच राज्यसभेत दिली होती. यामध्ये कॅनडा तसेच आखाती देशांचा सामावेश असल्याचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे.

leave a reply